Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात सध्या राजधानी मुंबई ते उपराजधानी नागपूर यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आले आहे. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग अंतर्गत 701 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार होत आहे.
यामुळे मुंबई आणि नागपूर ही दोन महत्त्वाची शहरे जोडली जाणार आहेत. राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत तयार होत असलेल्या या प्रवेश नियंत्रित महामार्गाचे आत्तापर्यंत 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.
या प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा मार्ग डिसेंबर 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पित झाला होता. यानंतर गेल्या वर्षी या प्रकल्पाचा दुसरा टप्पा म्हणजेच शिर्डी ते भरवीर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात आला आहे.
यानंतर भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. म्हणजेच आतापर्यंत नागपूर ते इगतपुरी असा 625 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग हा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे.
दरम्यान याच समृद्धी महामार्गाबाबत एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. आता समृद्धी महामार्गाचा विस्तार केला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जालना-नांदेड असा नवीन समृद्धी महामार्ग तयार होणार आहे.
हा एक सहापदरी प्रवेश-नियंत्रित महामार्ग प्रकल्प राहणार आहे. याची लांबी ही जवळपास 180 किलोमीटर एवढी राहणार आहे आणि याचे काम महाराष्ट्र प्रदेश विकास प्राधिकरणाने हाती घेतले आहे.
दरम्यान या जालना-नांदेड प्रवेश नियंत्रित महामार्गसाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी १० स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांनी एकूण २३ निविदा सादर केल्या आहेत.
सध्या या निविदांची छाननी सुरू लवकरच निवेदन केल्या जाणार आहेत. १७९.८५ किमी लांबीच्या जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग प्रकल्पाचे उत्तरी टर्मिनल ७०१ किमी लांबीच्या मुंबई-नागपूर द्रुतगती मार्गावर (समृद्धी महामार्ग) राहणार आहे.
हा प्रस्तावित महामार्ग रेडी झाल्यानंतर हे दोन्ही प्रकल्प एकमेकांना जोडले जाणार आहेत. परिणामी मराठवाड्यातील नांदेड ते मुंबई दरम्यानचा प्रवास वेळ हा पाच तासांनी कमी होणार आहे. सध्या नांदेड ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना ११ तासांचा कालावधी लागतोय.
पण जेव्हा हा प्रस्तावित महामार्ग पूर्णपणे रेडी होईल आणि यावर वाहतूक सुरू होईल तेव्हा 120 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहनांना जाता येणार आहे. यामुळे या दोन्ही शहरादरम्यानचा 11 तासाचा प्रवास फक्त सहा तासात पूर्ण होऊ शकणार आहे.