Maharashtra Monsoon News : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सामान्य नागरिकांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसासंदर्भात. खरंतर गेल्या महिनाभर महाराष्ट्रात पाऊस पडला नाही. ऑगस्ट महिना कोरडाच गेला. यामुळे खरिपातील पिके पावसाअभावी करपून गेली आहेत.
सोयाबीन, कापूस, तूर, मका ही पिके पावसाच्या कमतरतेमुळे अक्षरशात जळून गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपातील पिकांना खतांचा दुसरा डोस दिला.
शिवाय खराब वातावरणामुळे पिकांवर विविध कीटकांचा आणि रोगराईचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता म्हणून महागड्या औषधांची फवारणी देखील केली होती. ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस होईल आणि पिकांची चांगली वाढ होईल अशा आशेने शेतकऱ्यांनी खतांची मात्रा दिली आणि औषधाची फवारणी केली होती.
परंतु ऑगस्ट महिन्यात चार ते पाच दिवसांचा कालावधी वगळता उर्वरित महिनाभर हवामान कोरड राहील. यामुळे शेती पिके करपली आहेत आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आता सप्टेंबर महिन्यात जर चांगला पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील भेडसावणार आहे. यामुळे सर्वत्र पावसाची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
सगळ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत. अशातच हवामान विभागाच्या माध्यमातून एक अतिशय दिलासादायक माहिती देण्यात आली आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे या संबंधित भागांसाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. खरंतर गेल्या महिन्यात एकदाही पावसाचा अलर्ट देण्यात आला नव्हता. मात्र सप्टेंबर महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
कुठे पडणार पाऊस
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, अकोला, नागपूर, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यांसाठी आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांसाठी देखील आज आणि उद्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असे चित्र आहे.