Maharashtra Metro : महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या डोकं वर काढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर सारख्या शहरांमध्ये तर वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. हेच कारण आहे की, या तिन्ही शहरांमध्ये मेट्रो सुरु झाली आहे.
मेट्रोमुळे या शहरांमधील वाहतूक कोंडी बऱ्यापैकी कमी झाली आहेत. यामुळे या शहरांमधील मेट्रोचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत आहे. दरम्यान ठाणे शहरातही गेल्या काही वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या मोठी जटील बनत असून या शहरातही आता मेट्रो सुरु होणार आहे.
खरे तर गेल्या अनेक वर्षांपासून ठाणेकर मेट्रोची वाट पाहत आहेत. ठाण्यातील पहिल्या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील नुकत्याच काही दिवसांपूर्वी संपन्न झाले आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो मार्गाचे उद्घाटन संपन्न झाले असून सध्या या मार्गाच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.
मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यापासून या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होणार आहे. या मेट्रो मार्गाचे काम सुरू झाल्यानंतर पाच वर्षात हा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ठाणे शहरात तयार होणारा हा मेट्रो मार्ग 29 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.
यातील तीन किलोमीटर लांबीचा मार्ग हा भूमिगत असेल आणि उर्वरित 26 किलोमीटर लांबीचा मार्ग उन्नत राहणार आहे. या मार्गावर एकूण 22 स्टेशन तयार होणार आहेत. यातील एक स्थानक हे ठाणे रेल्वे स्टेशनला जोडले जाणार आहे.
यामुळे जे लोक ठाणे रेल्वे स्थानकावर उतरतील त्यांना जलद गतीने मेट्रोची सेवा अनुभवता येणार आहे. एवढेच नाही तर मुलुंड आणि ठाण्याच्या मधोमध जे नवीन रेल्वे स्थानक तयार होणार आहे त्याला देखील मेट्रोचे एक स्टेशन जोडले जाणार अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हा मेट्रो मार्ग ठाणे शहरातील पहिला अंतर्गत मेट्रो मार्ग राहणार आहे. ठाण्यातून सध्या जे मेट्रो 4 आणि मेट्रो 5 गेलेले आहेत या मेट्रो मार्गांना देखील हा अंतर्गत मेट्रो मार्ग जोडला जाणार हे विशेष. यामुळे ठाण्यात मेट्रोचे जाळे तयार होणार आहे.
यामुळे ठाणेकरांचा प्रवास हा वाहतूक कोंडी मुक्त होईल अशी आशा आहे. एकंदरीत मुंबई, पुणे, नागपूर नंतर आता ठाण्यातही अंतर्गत मेट्रो मार्ग तयार होणार असून यामुळे भविष्यात सर्वसामान्य ठाणेकरांचा प्रवास हा जलद आणि सुरक्षित होणार अशी आशा आहे.