Maharashtra Latest Weather Update : 1901 नंतर 2023 मधील ऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त पावसाचा खंड नमूद करण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यातील बहुतांशी भागात तब्बल 25 दिवसांचा पावसाचा खंड पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत या चालू महिन्यात राज्यात केवळ 40 टक्के एवढा पाऊस झाला आहे. ऑगस्ट महिन्यातील 31 दिवसांपैकी (आजचा दिवस धरून) फक्त चार दिवस पावसाची नोंद करण्यात आली आहे.
म्हणजेच तब्बल 26 दिवसांच्या कालावधीत पावसाचा खंड राहिला आहे. भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला आहे. यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. आता मान्सूनचा फक्त एक महिना शिल्लक राहिला असून आत्तापर्यंतच्या तीन महिन्याच्या मान्सूनमध्ये फक्त एक महिना चांगला पाऊस झाला आहे. म्हणून महाराष्ट्र जवळपास दुष्काळाच्या उंबरठ्यावरच आहे, असे बोलले जात आहे.
तर काही भागात दुष्काळ पडला आहे असे म्हणता येईल. कारण की राज्यातील काही भागात आत्तापासूनच पाणी संकट पाहायला मिळत आहे. पावसाअभावी शेतातील पिके करपून गेली आहेत. आगामी काही दिवस जर पाऊस पडला नाही तर जनावरांना चारा देखील उपलब्ध होणार नाही असे चित्र आहे. एवढेच नाही तर राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनणार असा इशारा जाणकार लोकांनी दिला आहे.
यामुळे सबंध महाराष्ट्र सध्या देवाकडे जोरदार पाऊस पडू दे रे बाबा अशी विनवणी करू लागला आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्यातील पावसाची तूट सप्टेंबर महिन्यात भरून निघेल का? असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच सप्टेंबर महिन्यात जोरदार पावसाला सुरुवात केली केव्हा होणार? जोरदार पाऊस पडणार की नाही असे देखील काही प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत.
दरम्यान भारतीय हवामान विभागाने याबाबत मोठी माहिती दिली आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात जोरदार पावसासाठी पोषक हवामान तयार होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील जोरदार पावसासाठी आवश्यक असलेला कमी दाबाचा पट्टा आता बंगालच्या उपसागरात तयार होत आहे. यामुळे कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता राज्यात लवकरच जोरदार सऱ्या बरसणार असा अंदाज आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, येत्या 5 सप्टेंबरपासून किंवा त्यानंतर विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. अर्थातच राज्यात 5 सप्टेंबर नंतरच मुसळधार पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यापूर्वी मात्र जोरदार पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे देखील आय एम डी ने यावेळी स्पष्ट केले आहे. एकंदरीत जोरदार पावसासाठी आता 5 सप्टेंबर पर्यंत ची वाट पहावी लागणार आहे.