Maharashtra Latest Havaman Andaj : सध्या महाराष्ट्रात पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतेत पाहायला मिळत आहेत. खरीप हंगामातील सोयाबीन आणि कापूस ही पिके वाढीच्या अवस्थेत असून या अवस्थेत पिकांना पावसाच्या पाण्याची नितांत आवश्यकता भासत आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाचा खंड असल्याने बळीराजाच्या नजरा आभाळाकडे आहेत.
भर पावसाळ्यात पावसाचा खंड पडला असल्याने हे दुष्काळाचे संकेत तर नाहीत ना असा प्रश्न देखील शेतकऱ्यांना पडला आहे. हा प्रश्न पडण्याचे कारणही तसे खासच आहे. खरंतर मान्सूनच्या अगदी सुरुवातीला अमेरिकेच्या हवामान विभागाने यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे भारतात दुष्काळ पडणार असा अंदाज व्यक्त केला होता.
अशातच खरीप हंगाम ऐन महत्त्वाच्या टप्प्यावर असतानाच आता गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली असल्याने ही दुष्काळाच्या आधीची चाहूल तर नाही ना अशी भीती शेतकऱ्यांना वाटतं आहे. सध्या खरीप हंगामातील सोयाबीन हे पीक फुलोरा अवस्थेत आहे.
कापसाचे पीक देखील 40-50 दिवसांचे बनले आहे. अनेक भागात शेतकरी बांधव कापसाच्या पिकाला खताचा दुसरा डोस देत आहेत. अशा परिस्थितीत कापूस आणि सोयाबीन या खरीप हंगामातील मुख्य पिकांसाठी पावसाच्या पाण्याची गरज आहे. जर आगामी काही दिवस पाऊस झाला नाही तर ही पिके वाया जातील असं शेतकरी बांधव सांगत आहेत.
अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी पावसासंदर्भात एक महत्त्वाची माहिती दिली आहे. साबळे यांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्रावर हवेचा दाब 1006 ते 1008 हेक्ट पास्कल एवढा आहे.
हा जास्तीचा हवेचा दाब मात्र पावसासाठी प्रतिकूल ठरत आहे. महाराष्ट्रावर हवेचा दाब जास्त असल्याने या ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत राज्यात कुठेच जोरदार पाऊस झाला नसल्याचे मत साबळे यांनी व्यक्त केले असून आगामी काही दिवसात ही परिस्थिती बदलणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.
साबळे यांनी सांगितल्याप्रमाणे, 18 तारखेनंतर महाराष्ट्रावरील हवेचा दाब कमी होणार असून यानंतर पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार होईल आणि राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडेल. तसेच गेल्या काही दिवसांपासून अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान देखील कमी झाले होते.
मात्र आता अरबी समुद्राच्या तापमानात देखील वाढ होणार आहे आणि याचा परिणाम म्हणून कोकणात आणि विदर्भात जोरदार पाऊस पडणार असा अंदाज आहे. तसेच 15 आणि 16 ऑगस्टला विदर्भातील भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे एल निनोची तीव्रता अद्याप फारशी वाढलेली नाही. यामुळे ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाची शक्यता असल्याचे साबळे यांनी नमूद केले आहे. सप्टेंबर महिन्यात राज्यातील अनेक भागात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणावर पडेल असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले.
विशेष म्हणजे या उर्वरित मान्सून काळात फार चांगला पाऊस झाला नाही तरी देखील खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळेल असा पाऊस पडणार म्हणजे पडणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.