Maharashtra Ladki Bahin Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून शासनाकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. राज्य शासनाने महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी अशीच एक कौतुकास्पद योजना सुरू केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असे या योजनेचे नाव. योजना नुकतीच सुरू झाली असून या अंतर्गत दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत.
अर्थातच या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या राज्यातील महिलांना वर्षाला 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. खरंतर ही स्कीम मध्य प्रदेश राज्यात सुरू असणाऱ्या लाडली बहना अंतर्गत सुरू करण्यात आलेली आहे. यासाठी राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला पात्र ठरणार आहेत.
21 ते 65 वर्षे वयोगटातील महिला याच्या लाभासाठी पात्र राहणार आहेत. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांना याचा लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे अविवाहित महिला देखील या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत.
दरम्यान रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या आणि पात्र ठरणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळाले आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थातच 14 ऑगस्ट च्या सायंकाळी राज्यातील काही पात्र महिलांच्या खात्यावर या योजनेच्या दोन्ही हप्त्यांचे पैसे जमा करण्यात आले.
त्यानंतर 15 ऑगस्टच्या सकाळी लाखो महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. तसेच उर्वरित पात्र महिलांना 19 ऑगस्ट च्या आत या योजनेचे पैसे मिळालेत. खरे तर या योजनेचे पैसे मिळाले म्हणून लाखो महिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव होते.
मात्र जेव्हा काही महिला हे पैसे बँकेत काढण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांच्या खात्यावर पैसेचं नव्हते. तसेच काही महिलांच्या खात्यावर कमी पैसे होते. यामुळे महिला वर्गांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले.
शिंदे सरकारने खात्यात टाकलेले पैसे नेमके गेलेत कुठे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. खरंतर अनेक पात्र महिलांनी त्यांच्या बँक अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स मेंटेन केलेला नव्हता. यामुळे शिंदे सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर बँकेने त्यांच्याकडून दंड वसूल केला.
दंड म्हणून बँकेने या लाडक्या बहिणींच्या खात्यातून रक्कम वजा केली. यामुळे महिलावर्ग नाराज झाला होता. पण आता सरकारने या मुद्द्याकडे गांभीर्याने लक्ष घातले आहे. सरकारने राज्यातील सर्व बँकांना यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
लाडकी बहिण योजनेचे पैसे बँकांनी कपात करू नये अशा सूचना महिला व बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरे यांनी बँकांना दिल्या आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत.
लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही, कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल तर ते पूर्ववत करण्यात यावे असेही निर्देश बँकांना दिले गेले आहेत.
नक्कीच राज्य शासनाच्या निर्णयामुळे या योजनेच्या पात्र महिलांना दिलासा मिळणार आहे. ज्या महिलांचे पैसे कापले गेले असतील त्यांना आता हे पैसे परत मिळू शकणार आहेत. यामुळे पुन्हा एकदा महिला वर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळतय.