Maharashtra Ladka Bhau Yojana : राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. विशेष म्हणजे या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. 1 जुलैपासून या योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
या अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपयांची मदत दिली जाणार आहे. म्हणजेच पात्र ठरणाऱ्या महिलांना एका वर्षात 18 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. यामुळे महाराष्ट्रात सध्या या योजनेची मोठी चर्चा आहे.
दरम्यान लाडक्या बहिणींसाठी सरकारने योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावांसाठी देखील योजना सुरू झाली पाहिजे अशी मागणी जनमानसातून उपस्थित झाली होती. याच मागणीच्या पार्श्वभूमीवर आता सरकारने राज्यातील लाडक्या भावांसाठी एक विशेष योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका विशेष योजनेची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, या योजनेअंतर्गत राज्यातील तरुण विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम दिली जाणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 6000, डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 8000 आणि पदवीधर विद्यार्थ्यांना 12 हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे.
मात्र ही रक्कम सर्वच विद्यार्थ्यांना मिळणार नाही. खरे तर जे विद्यार्थी कंपनीत अप्रेन्टिसशिप करतील त्या विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत ही रक्कम मिळणार आहे.
थोडक्यात काय तर अप्रेन्टिसशिप करणाऱ्या बारावी उत्तीर्ण, डिप्लोमाधारक आणि पदवीधर विद्यार्थ्यांना सरकार स्टायपंड म्हणून प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम देणार आहे.
अप्रेन्टिसशिपची रक्कम स्वतः राज्य सरकार देणार आहे. खरंतर, आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादषीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाची शासकीय पूजा केली आहे. शासकीय पूजेसाठी मुख्यमंत्री महोदय कालच पंढरपुरात दाखल झालेत.
काल मुख्यमंत्री शिंदे यांनी कृषी पंढरी २०२४ प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्याला देखील हजेरी लावली. या सोहळ्यातूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील लाडक्या भावांसाठी स्टायपंड देण्याची घोषणा केली आहे.
नक्कीच ही योजना सुरू झाल्यानंतर राज्यातील तरुण विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेऊन अप्रेन्टिसशिप पुर्ण तर करताच येणार आहे शिवाय भविष्यात चांगल्या कंपनीत कायमस्वरूपी नोकरी सुद्धा मिळवता येणार आहे.