maharashtra kanda bajarbhav : महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बुरे दिन आले आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस कांदा दराला अच्छे दिन होते मात्र अचानक कांदा दरात मोठी घसरण झाली आहे.
कांदा आगार म्हणून संपूर्ण भारत वर्षात विख्यात नासिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात तब्बल 1200 रुपयांपर्यंतची घसरण झाली आहे. जाणकार लोकांना कांदा दरात घसरण झाल्याची कारणे विचारली असता त्यांनी कर्नाटक-आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांनी उशिरा केलेली लागवड, राजस्थानमधील नवीन कांद्याची आवक आणि मध्य प्रदेशातील कांद्याची उपलब्धता अशा कारणांमुळे कांदा दरात घसरण झाल्याचे नमूद केले आहे.
खरं पाहता दक्षिणेतील कांदा हा नोव्हेंबरच्या महिन्यात संपतो. दक्षिणकडील राज्यांचा कांदा संपल्यानंतर व्यापारी लोक सरळ नासिक मध्ये कांदा खरेदीसाठी धाव घेतात. मात्र यावर्षी उलट झालं अजूनही दक्षिणेकडील राज्यांमधील कांदा संपलेला नाही. त्यामुळे नाशिक मधील कांद्याला उठाव मिळत नाहीये. परिणामी कांदा आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यासमवेत संपूर्ण महाराष्ट्रात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
दक्षिणेकडील राज्यांमध्ये अजूनही कांदा उपलब्ध आहे कारण की त्यांनी पावसाच्या लहरीपणाचा अंदाज बांधत यावर्षी उशिरा कांदा लागवड केली. परिणामी बाजारात कांदा उशिरा दाखल झाला आणि अजूनही बाजारात कांदा विक्रीसाठी दाखल होत आहे. शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामात उत्पादित झालेला कांदा अधिक दर मिळेल म्हणून बराकीत साठवून ठेवला, दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात कांद्याला चांगला दर मिळतो.
यावर्षी देखील चांगला दर मिळेल म्हणून शेतकऱ्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. मात्र दक्षिण मधीलराज्यात यंदा कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, परिणामी महाराष्ट्रातील कांद्याला उठाव मिळाला नाही, कांदा दरात घसरण झाली म्हणून उन्हाळी कांदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विक्रीस काढला अशा परिस्थितीत कांदा दरातील घसरण अजूनच वाढली.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, एक नोव्हेंबर रोजी पिंपळगाव बाजार समितीत कांद्याला 2650 रुपये प्रति क्विंटलचा सरासरी दर मिळाला तर आज झालेल्या लिलावात कांद्याला 1451 रुपये प्रति क्विंटल एवढाच दर मिळाला. आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव एपीएमसीमध्ये देखील असच काहीस पाहायला मिळाल. लासलगाव मध्ये 1 नोव्हेंबरला कांद्याला 2470 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर आज चौदाशे रुपये प्रति क्विंटल एवढा दर नमूद झाला आहे.
कांदा दरात दक्षिणेकडील राज्यात मुबलक प्रमाणात कांदा उपलब्ध असल्याने घसरण झाली आहे हे नक्कीच. मात्र याव्यतिरिक्त निर्यात होणाऱ्या कांदा दरात देखील मोठी घसरण झाली असल्याने देशांतर्गत कांदा बाजार भाव दबावात असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी श्रीलंकेत 500 डॉलर प्रति टन याप्रमाणे कांदा निर्यात होत होता मात्र आता यामध्ये मोठी घसरण झाली असून साडेतीनशे डॉलर प्रति टन याप्रमाणे कांदा श्रीलंकेत विक्री होत आहे.
बांगलादेश मध्ये देखील गेल्या काही दिवसांपूर्वी चारशे डॉलर प्रति टन याप्रमाणे कांदा निर्यात होत होता मात्र आता बांगलादेशमध्ये 281 डॉलर प्रति टन याप्रमाणे कांदा निर्यात होत आहे. निश्चितच निर्यातीच्या कांद्यात झालेली घसरण दक्षिणेकडील राज्यात असलेला मुबलक कांदा या समीकरणामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधव मेटाकुटीला येत असल्याचे चित्र आहे.