Maharashtra Havaman Andaj : यंदा पावसाळा सुरू होऊन जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी उलटला आहे. या अडीच महिन्याच्या काळात मात्र पावसाने आपले सर्वे रंग दाखवले आहेत. सुरुवातीला राज्यातील बहुतांशी भागात पावसाने उघडीप दिली होती. जून महिन्यात राज्यातील कोणत्याच जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही.
जून महिन्याच्या शेवटी कोकणातील काही जिल्ह्यात जरूर पाऊस झाला मात्र राज्यातील उर्वरित भागात अपेक्षित असा पाऊस झाला नव्हता. यामुळे शेतकरी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच चिंतेत आले होते. पण जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हवामानात मोठा बदल झाला आणि राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.
जुलै महिन्यात कमी वेळेत एवढा पाऊस पडला की जून महिन्याची पावसाची तूट भरून निघाली. यामुळे आता ऑगस्ट महिन्यात देखील चांगला पाऊस होईल आणि यंदाचा खरीप हंगाम चांगले उत्पन्न देऊन जाईल अशी भोळी-भाबडी आशा बळीराजाला लागून होती.
पण ऑगस्ट महिन्याचे आता जवळपास 17 दिवस उलट चालले आहेत तरी देखील राज्यात कुठेच मुसळधार पाऊस झालेला नाही. या ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांशी भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहिले आहे. पावसाचा हा मोठा खंड शेतकऱ्यांची चिंता वाढवत आहे.
याआधी १९७२ च्या दुष्काळात देखील भर पावसाळ्यातच पावसाने बरेच दिवस विश्रांती घेतली होती. आता 1972 नंतर म्हणजेच तब्बल पाच दशकांच्या काळानंतर अशी परिस्थिती पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. यामुळे 2023 मध्ये 1972 प्रमाणे दुष्काळ तर पडणार नाही ना असा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहेत.
अशातच मात्र हवामान विभागाच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे पण प्रत्यक्षात मुसळधार पाऊस केव्हा सुरू होणार? हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. याबाबत भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आता पुढील दोन ते तीन दिवस बहुतांशी भागात मुसळधार पाऊस होणार आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने १९ ऑगस्ट नंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. येत्या 24 तासात कोकण, मुंबई आणि ठाणे शहरात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो असे देखील आयएमडीने सांगितले आहे.
हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आजपासून आगामी काही दिवस राज्यातील कोकण, मुंबई, ठाणे आणि विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. याशिवाय उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
मुंबईसह नासिक आणि पुण्यात देखील येत्या 48 तासात काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाचा अंदाज आहे. यामुळे या संबंधित भागातील खरीप हंगामातील पिकांना पुन्हा एकदा नवीन जीवदान मिळणार असल्याचे मत आता व्यक्त होऊ लागली आहे.