Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि थोडीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे अवकाळी पावसासंदर्भात. भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीट धुमाकूळ घालणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यामुळे रब्बी हंगामातील शेती पिकांची हार्वेस्टिंग करत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या स्थितीला रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या पिकांची हार्वेस्टिंग युद्ध पातळीवर सुरू आहे. काही ठिकाणी हार्वेस्टिंगची कामे पूर्ण झाली आहेत.
अशातच मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा हवामान अंदाज समोर आला आहे. हवामान खात्याने आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा इशारा जारी केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार अवकाळी पाऊस ?
हवामान खात्याने महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह विविध भागात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
IMD अस म्हणतंय की, उत्तर ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळली आहे. पण ही परिस्थिती निवळली असली तरी देखील पश्चिम बंगालपासून आंध्र प्रदेशापर्यंत तसेच, मराठवाड्यापासून कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा अजूनही सक्रिय आहे.
या भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने ही वातावरणीय परिस्थिती पावसासाठी पोषक परिस्थिती तयार करत आहे. ही स्थिती अवकाळी पावसासाठी आणि गारपिटीसाठी पूरक ठरत आहे.
हेच कारण आहे की आज आपल्या राज्यात वादळी पावसाचा आणि गारपिटीचा इशारा हवामान खात्याच्या माध्यमातून जारी करण्यात आला आहे.
आज राज्यातील नागपूर, भंडारा, गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीटीची शक्यता असल्याचा अंदाज आय एम डी ने दिला असून या तिन्ही जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
यामुळे या सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. गारपीटीची शक्यता पाहता आपला शेतमाल शेतकऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवला पाहिजे.
तसेच पशुधन देखील सुरक्षित ठिकाणी बांधले पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना कोणतेच नुकसान सहन करावे लागणार नाही. पण, उर्वरित राज्यात मात्र ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहणार अस सुद्धा यावेळी हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.