Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढू लागला आहे. थंडीचा जोर वाढत असल्याने रब्बी हंगामातील पिकांना याचा मोठा फायदा मिळत आहे. खरं तर गेल्या महिन्यात अर्थातच नोव्हेंबर मध्ये आणि डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला.
अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांना आणि फळबागांना मोठा फटका बसला होता. शेतकऱ्यांनी अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पीक यामुळे अडचणीत आले होते. आता मात्र राज्यातील हवामान कोरडे झाले आहे. शिवाय थँडीचा देखील जोर वाढत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्या उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडत आहे. उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट आली आहे.
शिवाय जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश मध्ये काही ठिकाणी बर्फवृष्टी होत आहे. याचा परिणाम म्हणून उत्तरेकडील राज्यांमधून आपल्या महाराष्ट्रात थंडे वारे वाहू लागले आहेत.
परिणामी आता राज्यात कडाक्याची थंडी पडत आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवस राज्यात अशीच जोरदार थंडी पडणार असा अंदाज आहे.
अशातच आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी म्हटल्याप्रमाणे आगामी काही दिवस महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. राज्यात आता 30 डिसेंबर पर्यंत हवामान कोरडे राहील.
30 डिसेंबर पर्यंत महाराष्ट्रात कुठेच अवकाळी पाऊस पडणार नाही. यानंतर मात्र राज्यातील हवामानात मोठा बदल होईल आणि राज्यात जानेवारी 2024 मध्ये अवकाळी पाऊस बरसेल असा अंदाज आहे.
म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात अवकाळी पावसाने होऊ शकते असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे. तसेच या हवामान अंदाजात पंजाबरावांनी एक महिन्याआड महाराष्ट्रात मोठा पाऊस पडणार अस सांगितलं आहे.
म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात मोठा पाऊस झाला, त्यानंतर डिसेंबर महिन्यात पावसाची तीव्रता कमी झाली आता जानेवारी महिन्यात पुन्हा एकदा पावसाची तीव्रता वाढणार आहे.
एकंदरीत जानेवारी महिन्यामध्ये राज्यात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांना पुढल्या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.