Maharashtra Havaman Andaj : फेब्रुवारी महिना येत्या काही दिवसात निरोप घेणार आहे. यामुळे आता थंडीचा देखील जोर कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. खरेतर फेब्रुवारी अखेरपर्यंत चांगली कडाक्याची थंडी पडते. यंदा मात्र थंडी लवकरच एक्झिट घेणार असे चित्र आहे.
कारण की आता राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहे. यामुळे थंडीची तीव्रता फार कमी झाली आहे. अशातच मात्र राज्यातील हवामानात पुन्हा एक बदल पाहायला मिळतं आहे.
भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, येत्या चार-पाच दिवसात महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे.
26 आणि 27 फेब्रुवारीला राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरातून आग्नेय वारे राज्यात आदर्ता घेऊन येतील आणि यामुळे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये ढगाळ हवामान आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
IMD ने आगामी चार-पाच दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र तदनंतर राज्यातील हवामानात बदल होईल आणि 26 व 27 फेब्रुवारीला काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल असे म्हटले आहे.
या कालावधीमध्ये राज्यातील कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.
खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विदर्भ मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे. विशेष म्हणजे विदर्भातील काही भागात गारपीट देखील झाली.
याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील गव्हाचे आणि हरभऱ्याचे मोठे नुकसान झाले. ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेल्या गहू पिकाचे अतोनात असे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
अशातच आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.