Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात सात ते दहा सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस पडल्यानंतर पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतली आहे. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात चार दिवस पाऊस पडला यामुळे खरीप हंगामातील पिकांना पुन्हा एकदा नवीन जीवदान मिळाले होते. या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये कमालीचे समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.
ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असल्याने आता सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडेल आणि गेल्या महिन्यातील पावसाची तूट भरून निघेल असे सर्वसामान्यांना वाटत होते. शिवाय हवामान विभागाने देखील या महिन्यात चांगला पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला होता. काही हवामान तज्ञांनी सप्टेंबर महिन्यात गेल्या ऑगस्ट महिन्यापेक्षा चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त केली होती.
पण आतापर्यंतची पावसाची परिस्थिती पाहता हवामान तज्ज्ञांचा आणि हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरलेला नाही. चालू महिन्यात तीन ते चार दिवस चांगला पाऊस झाला आहे मात्र शेतकऱ्यांना जशी आशा होती तसा पाऊस अद्याप पाहायला मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढतच आहे.
आता सप्टेंबरचा पहिला पंधरवडा जवळपास उलटला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात तरी चांगला पाऊस पडेल आणि शेती पिकांना जीवदान मिळेल अशी भोळी भाबडी आशा लागून आहे. अशातच हवामान विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
ती म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आगामी चार दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. याबाबत कुलाबा वेधशाळेने माहिती दिली आहे. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात पुढील चार दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. शिवाय उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातही चांगला पाऊस पडणार असे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.
धुळे जिल्ह्यातही काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता यावेळी वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव आणि धुळे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने याचा परिणाम म्हणून आगामी काही दिवस धुळे आणि जळगाव जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याव्यतिरिक्त विदर्भातही या कालावधीत पाऊस पडू शकतो. हवामान विभागाने आज दुपारनंतर जळगाव जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच दुपारनंतर जिल्ह्यात 30 ते 40 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील आहे.
जळगाव जिल्ह्यात 14 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे. एकंदरीत जिल्ह्यात 18 सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शेती पिकांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे सांगितले जात आहे.