Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रात जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने मोठी विश्रांती घेतली आहे. जवळपास ऑगस्ट महिन्यात 15 ते 16 दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून राज्यात वरुणराजाने पुन्हा एकदा ठिकठिकाणी हजेरी लावली आहे.
मात्र राज्यात सध्या रिमझिम स्वरूपाचा पाऊस होत असून शेतकऱ्यांना मुसळधारेची गरज आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने एक नवीन हवामान अंदाज व्यक्त करत राज्यात या चालू ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आपल्या राज्यात जोरधारा सप्टेंबर महिन्यातच होणार असल्याचे सांगितले जात आहे. सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यात राज्यात जोरदार पावसाला सुरुवात होऊ शकते अर्थातच पावसाचा जोर वाढू शकतो असे हवामान विभागाने सांगितले आहे.
मात्र राज्यात पावसाची बिकट परिस्थिती असतानाच देशातील काही राज्यात अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीमुळे संबंधित राज्यातील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. एवढेच नाही तर 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान देशातील एकूण सात राज्यात पुन्हा एकदा अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे आधी संकटात सापडलेल्या हिमाचल प्रदेश मध्ये आणि उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टी होणार असा अंदाज आहे. देशातील हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात 21 ते 24 ऑगस्ट दरम्यान मुसळधार पाऊस होणार तसेच काही भागात अतिवृष्टी होणार असा अंदाज व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून या कालावधीसाठी संबंधित राज्यांना ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील जनजीवन आधीच विस्कळीत झाले आहे.
या दोन्ही राज्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी देखील झाली आहे. आता पुन्हा एकदा या दोन्ही राज्यात 115.6 ते 204.4 मिमीपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याशिवाय उत्तर प्रदेशात देखील अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे.
मेघालय, त्रिपुरा, नागालँड, मणिपूर आणि मिझोराम या ईशान्यकडील राज्यात देखील आगामी तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या कालावधीत संबंधित राज्यात वादळी वारे वाहण्याचीही शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित राज्यातील नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.