Maharashtra Havaman Andaj : ऑगस्ट महिन्यातील 17 ते 18 दिवस राज्यातील हवामान कोरडे राहिल्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागात पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
आता खरीप हंगामातील पिकांना पुन्हा एकदा नवीन जीवदान मिळणार अशी आशा व्यक्त केली जाऊ लागली आहे. मात्र असे असले तरी राज्यातील कोकण आणि विदर्भ विभागातच पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. या दोन विभागात मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात अजूनही हवामान प्रामुख्याने कोरडेच आहे.
कोकण आणि विदर्भ विभाग वगळता उर्वरित राज्यात पावसाचा जोर अजूनही ओसरलेलाच आहे. पण उत्तर भारतात मात्र पावसाचा जोर कायम आहे. गेल्या आठवड्यात उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यात अतिवृष्टी झाली होती. यामुळे उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश मधील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले.
त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होत आहे. विशेष बाब म्हणजे आगामी काही दिवस उत्तर भारतात पावसाचा जोर असाच कायम राहणार असा अंदाज आहे. उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आपल्या महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यात फक्त कोकण, विदर्भातील काही भाग आणि मध्यमहाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार ते मध्यम पाऊस सध्या सुरु आहे. तसेच आगामी काही तास म्हणजे 23 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा फारसा जोर राहणार नाही असे सांगितले जात आहे.
पुणे वेधशाळेने 23 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, राज्यातील कोकण आणि विदर्भ विभागात 25 ऑगस्ट नंतर पावसाची तीव्रता वाढू शकते या विभागात येत्या तीन दिवसानंतर पावसाचा जोर वाढणार असा अंदाज आहे.