Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आणि सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. ही बातमी आहे पावसासंदर्भात. खरतर यंदा महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. यंदा मान्सूनचे आगमन राज्यात उशिराने झाले होते.
मान्सूनचे आगमन झाल्यानंतरही राज्यात जून महिन्यात अपेक्षित असा पाऊस झाला नाही. जून महिन्यात राज्यात सर्वत्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आले होते. परंतु जुलै महिन्यात राज्यात सर्व दुर जोरदार पाऊस झाला.
त्यामुळे आता यापुढे असाच पाऊस राहील आणि हा खरीप हंगाम चांगला फायदेशीर ठरेल अशी भोळी भाबडी आशा शेतकऱ्यांनी बाळगली होती. मात्र ही आशा ऑगस्ट महिन्यात धुळीस मिळाली. ऑगस्ट महिन्यात आत्तापर्यंत कुठेच जोरदार पाऊस झालेला नाही.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे मात्र मुसळधार पाऊस अजूनही राज्यात पाहायला मिळालेला नाही. यामुळे सध्या महाराष्ट्रातील अनेक भागात खरीप हंगामातील पिके करपू लागली आहेत. एवढेच नाही तर अनेक भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागला आहे.
आता ऑगस्ट महिना जवळपास संपत चालला आहे तरी देखील राज्यातील अनेक धरणे अजूनही 100% क्षमतेने भरलेली नाहीत. अशातच भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील काही दिवसात पावसाच प्रमाण आणखी कमी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यात सरासरीपेक्षा 25% कमी पाऊस झाला आहे. सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.
त्यामुळे या संबंधित जिल्ह्यांमध्ये पाणीसाठ्याची परिस्थिती देखील चिंताजनक बनत चालली आहे. या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील येत्या काही दिवसात ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. यामुळे हे दुष्काळाचे संकेत आहे अशा चर्चा देखील शेतकऱ्यांमध्ये सध्या पाहायला मिळत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर आत्तापर्यंत संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा सात टक्के कमी पाऊस झाला आहे. म्हणजेच राज्यातील केवळ काही जिल्ह्यात पावसाची कमी नोंद झाली आहे असे नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात कमी पाऊस पडला असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
राज्यात केवळ पालघर, ठाणे, मुंबई आणि नांदेड या जिल्ह्यात पावसाची चांगली परिस्थिती आहे. उर्वरित महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची चिंताजनक परिस्थिती आहे. विशेष म्हणजे पुढील चार ते पाच दिवसात राज्यभरात पावसाचे प्रमाण कमी होणार असा अंदाज आहे.
IMD ने सांगितल्याप्रमाणे, आज 23 ऑगस्ट रोजी विदर्भातील काही भाग आणि घाट भागात अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. मोठा पाऊस कुठेही अपेक्षित नाही. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण असेल. तर काही ठिकाणी हलक्या सरी कोसळणार असा अंदाज आहे.