Maharashtra Havaman Andaj : काल अर्थातच 25 सप्टेंबर रोजी पश्चिम राजस्थान मधून मान्सूनने आपला यंदाचा परतीचा प्रवास सुरू केला आहे. मानसूनने आता निरोप घेण्यास सुरुवात केली आहे. सध्या राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू असून आगामी काही दिवसात आपल्या महाराष्ट्रातूनही मान्सून परतणार आहे.
पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आपल्या महाराष्ट्रात 5 ऑक्टोबर नंतर मान्सूनचा परतीच्या प्रवास सुरू होणार आहे. अर्थातच वेधशाळेने वर्तवलेल्या या अंदाजात दोन-तीन दिवस मागे-पुढे होऊ शकते. मात्र पाच ऑक्टोबरच्या सुमारास मान्सून परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खरंतर यंदा मान्सून अगदी सुरुवातीपासूनच लहरीपणा दाखवत होता. जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणारा मान्सून यंदा शेवटच्या आठवड्यात आला. यामुळे जून महिन्यात खूपच कमी पावसाची नोंद झाली. जून मध्ये सरासरी एवढा पाऊस झाला नाही परंतु जुलै महिन्यात राज्यात मोठा पाऊस पडला. विविध भागात अतिवृष्टी देखील झाली.
यामुळे जून महिन्यातील पावसाची तूट बऱ्यापैकी भरून निघाली. अशातच मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाने तब्बल वीस दिवसांपेक्षा अधिक काळ खंड पाडला. यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रावर दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार झाली. महाराष्ट्र जवळपास दुष्काळाच्या उंबरठ्यावरच उभा होता. मात्र सप्टेंबर महिन्याची सुरुवात आशादायी झाली.
सप्टेंबरच्या सुरुवातीला राज्यातील काही भागात पाऊस झाला. सात सप्टेंबर ते 10 सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी लागली. यानंतर मात्र तब्बल आठ ते नऊ दिवस पावसाने पुन्हा एकदा विश्रांती घेतली. पण ही विश्रांती तुफान येण्यापूर्वीची होती.
19 सप्टेंबर पासून अर्थातच गणेश चतुर्थीच्या दिवसापासून राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी लागले आहे. नागपूर विभागात तर काही ठिकाणी ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे. अशातच पावसाबाबत हवामान खात्याने आणखी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.
मान्सून सरते शेवटी महाराष्ट्राला चांगलाच झोडपणार असल्याचे सांगितले जात आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार राज्यात अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजेच 28 सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे.
राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या विभागात 28 सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे. एकंदरीत गणरायाचे आगमनाला पाऊस सुरु झाला आणि आता गणरायाला निरोप देताना देखील बरसणार असल्याचा अंदाज आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील विदर्भ विभागातील यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, अमरावती, अकोला या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यात देखील 27 सप्टेंबर पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रमधील पुणे, सातारा, सोलापूर आणि उत्तर महाराष्ट्रमधील नाशिक, जळगाव तसेच कोकणातील रत्नागिरी, रायगड, ठाणे या भागातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.