Maharashtra Havaman Andaj : गेल्या ऑगस्ट महिन्यात भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला होता. यामुळे खरीपातील पिके करपण्याच्या अवस्थेत आली होती. अनेक भागात तर जुलै महिन्यातही चांगला पाऊस झाला नव्हता यामुळे तेथील पिके करपली होती. मात्र ज्या भागात जुलैमध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला होता त्या भागातील पिके आत्तापर्यंत तग धरून होती.
पण या अशा पिकांच्या वाढीवर देखील विपरीत परिणाम झाला आहे. दरम्यान राज्यात सप्टेंबर महिन्याची सुरुवात पावसाने झाली आहे. गेल्या तीन ते चार दिवसात राज्यातील बहुतांशी भागात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे खरिपातील पिकांना नवीन जीवदान मिळणार असे सांगितले जात आहे.
पावसाला पोषक हवामान तयार झाले असल्याने गेल्या 24 तासात विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची हजेरी लागली आहे. विशेष बाब म्हणजे आज सात सप्टेंबर 2023 रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा जोर वाढणार आणि चांगला पाऊस पडणार असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. आजही राज्यात पावसासाठी पोषक हवामान आहे.
IMD ने सांगितल्याप्रमाणे, आज राज्याच्या विविध भागांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील या संबंधित भागांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच उर्वरित राज्यात हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
आज कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील पुणे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर या 15 जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या संबंधित 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.