Maharashtra Havaman Andaj : डिसेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा उलटत चालला आहे. येत्या काही दिवसात नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. मात्र असे असतानाही अजूनही महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढत नसल्याने सर्वसामान्यांना कडाक्याची थंडी नेमकी पडणार केव्हा हा प्रश्न पडला आहे.
अशातच हवामान खात्याने राज्यातील हवामानाबाबत एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट दिली आहे. खरे तर गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट देखील झाली.
त्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातही बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट कायम होते.
पण या कालावधीत बरसलेल्या पावसाचा जोर काहीसा कमी होता. दरम्यान गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहिले आहे.
राज्यात कुठेच अवकाळी पावसाने हजेरी लावलेली नाही. राज्यातील काही भागात ढगाळ हवामान आहे तर काही ठिकाणी थोडीशी थंडी पडू लागली आहे. मात्र अजूनही राज्यातील कमाल तापमानात फारशी घट झालेली नाही.
दरवर्षी डिसेंबर महिन्यात जेवढे कमाल तापमान असते त्यापेक्षा अधिक कमाल तापमान नोंदवले जात असल्याने राज्यात अजूनही कडाक्याची थंडी पडत नसल्याचे स्पष्ट होत आहे. किमान तापमान देखील सरासरीपेक्षा अधिकच आहे. यामूळे कडाक्याच्या थंडीची महाराष्ट्रात प्रतीक्षा कायम आहे.
अशातच भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवस राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असा अंदाज दिला आहे. पुढील पाच दिवस राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे.
पण राज्यात कडाक्याच्या थंडीसाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार अशी शक्यता आहे. दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे.
पंजाब, हरियाना, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या उत्तर भागातील बहुतेक भागांमध्ये किमान तापमान ६ ते १० अंश सेल्सिअसच्या दरम्यान असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या मते रब्बी पिकांसाठी आता थंडीची गरज आहे.
कडाक्याची थंडी पडली तर रब्बी पिकांना पोषक हवामान तयार होईल आणि पिकांची चांगली वाढ होईल. पण काही हवामान तज्ञांनी यावर्षी जानेवारी महिन्यातच जोरदार थंडीला सुरुवात होणार असा अंदाज दिला आहे.