Maharashtra Havaman Andaj : राज्यात गेल्या काही दिवसांपासून दक्षिण महाराष्ट्रात विशेषता कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात वातावरणात मोठा बदल पहायला मिळत आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे.
विशेष म्हणजे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी देखील लागली आहे. ऐन दिवाळीच्या काळातच पावसाची हजेरी लागली असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या कोकणात खरीप हंगामातील धान पिकांची हार्वेस्टिंग सुरू आहे.
धान पीक काढणीच्या अवस्थेत आले आहे. काही भागात झेंडू हे फुलपीक देखील काढणीच्या अवस्थेत आले आहे. यामुळे धान आणि झेंडू पिकाला या पावसाचा मोठा फटका बसेल असे सांगितले जात आहे. तथापि, हा पाऊस रब्बी हंगामासाठी पोषक ठरू शकतो असेही मत व्यक्त होत आहे.
एकंदरीत या पावसामुळे काही शेतकऱ्यांना फायदा होईल तर काही शेतकऱ्यांचे यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशातच आताअवकाळी पाऊस महाराष्ट्रात आणखी किती दिवस बरसेल आणि कोणत्या भागात अवकाळी पावसाची हजेरी लागेल याबाबत भारतीय हवामान खात्याने एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची माहिती दिली आहे.
कुठं बरसणार अवकाळी पाऊस ?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागात तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस अर्थातच रविवार पर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
यानंतर मात्र अवकाळी पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा हा अवकाळी पावसासाठी पोषक ठरत आहे. मात्र आता अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा निवळण्याच्या मार्गावर आहे.
हा पट्टा रविवार पर्यंत पूर्णपणे निवळेल आणि त्यानंतर राज्यातून अवकाळी पाऊस देखील माघारी फिरेल असे सांगितले जात आहे. यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हवामान प्रामुख्याने कोरडे होईल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
पुढील दोन दिवस या जिल्ह्यात बरसणार पाऊस
IMD ने सांगितल्याप्रमाणे आगामी दोन दिवस कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये व गोव्यात मेघगर्जनेसह हलका पाऊस बरसणार आहे.
तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर या दक्षिणेकडील जिल्हा तसेच मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर येथे हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
पण रविवारनंतर राज्यातील हवामानात पुन्हा एकदा बदल होण्याची शक्यता असून रविवार नंतर राज्यातून पावसाची शक्यता कमी होईन असा अंदाज आहे. रविवारनंतर ढगाळ हवामान कमी होईल आणि मग राज्यभर हवामान कोरडे होईल असे IMD ने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
तसेच पुढील काही दिवस दक्षिण महाराष्ट्रात धुके पडेल असे देखील हवामान खात्याने सांगितले आहे. एकंदरीत रविवार नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामान पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. मात्र नोव्हेंबर महिन्यात थंडीचा जोर काहीसा कमी राहिला असा अंदाज आहे. परंतु डिसेंबरमध्ये थंडीचा जोरही वाढेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.