Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून आपल्या महाराष्ट्रातील हवामान कोरडे आहे. पण, चालू मार्च महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस झाला होता, काही ठिकाणी गारपीट देखील झाली होती.
याचा परिणाम रब्बी हंगामातील पिकांवर झाला आणि शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. शेतकऱ्यांनी अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेतीपिक या वादळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे खराब झाले आहे.
आता मात्र गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 38 ते 40°c पर्यंत जात आहे. दिवसाचे कमाल तापमान हे दिवसेंदिवस वाढतच आहे. अशातच मात्र पुन्हा एकदा हवामानात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भारतीय हवामान खात्याने राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे संकट असल्याचे म्हटले आहे. आयएमडीने राज्यातील काही भागांमध्ये आज जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर सदर भागातील जिल्ह्यांना आयएमडीने येलो अलर्ट देखील जारी केला आहे.
दरम्यान, आता आपण भारतीय हवामान विभागाने कोणत्या जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे आणि सध्याच्या अवकाळी पावसाचे नेमके कारण काय ? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
भारतीय हवामान विभागाचा अंदाज काय म्हणतो ?
हवामान खात्याने आपल्या नवीन बुलेटिनमध्ये आज राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दुसरीकडे, राज्यातील काही भागात आजही तापमानात चढ-उतार सुरूच राहील असा अंदाज आहे. आयएमडीच्यामध्ये आज राज्यातील पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे.
वादळी पावसाला पोषक परिस्थिती तयार होण्याचे कारण म्हणजे उत्तर ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झालेली आहे. तसेच, त्यापासून पूर्व विदर्भापर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा विकसित झाला आहे.
शिवाय, मराठवाड्यापासून कर्नाटक, तामिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे. याच हवामान प्रणालीमुळे पुन्हा एकदा राज्यात वादळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे.
आज, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना वादळी पावसाचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.