Maharashtra Havaman Andaj : राज्यातील हवामानात गेल्या वर्षातील जून महिन्यापासून मोठा बदल होत आहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाळी काळात राज्यात अपेक्षित असा पाऊस बरसला नाही. एलनिनोमुळे यावर्षी आपल्या देशात मान्सून काळात खूपच कमी पाऊस झाला आहे.
याचा परिणाम म्हणून खरीप हंगामातून शेतकऱ्यांना फारसे उत्पादन मिळालेले नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागली.
यामुळे रब्बी हंगामातील वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना या अवकाळी पावसाचा आणि ढगाळ हवामानाचा मोठा फटका बसला आहे. विशेष म्हणजे आगामी काही दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, नाशिकसह आणखी काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणून संबंधित जिल्ह्यांमधील शेती पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस देखील झाला आहे. विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात हलक्या पावसाची हजेरी लागली आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील शेती पिकांचे आणि चाऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने आज अर्थातच सहा जानेवारी 2024 ला राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली असल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे.
याचा परिणाम म्हणून राज्यातील किमान आणि कमाल तापमान थोडेसे वाढले असून यामुळे राज्यातून आता गारठा जवळपास गायब झाला आहे.
दरम्यान आज खानदेश पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
खानदेशमधील जळगाव, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, पुणे, नाशिक, अहमदनगर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेती पिकांची पशुधनाची आणि चाऱ्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.