Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रासहित देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानात सातत्याने बदल होत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला होता. त्यावेळी काही ठिकाणी गारपीट देखील झाली. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गेल्या वर्षी रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला.
विशेष म्हणजे या नवीन वर्षाची सुरुवात देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसानेच झाली. मध्यंतरी पुन्हा एकदा राज्यावर ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसाचे सावट तयार झाले होते. अशातच काही जागतिक हवामान संस्थांनी आणि स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थेने भारतात यावर्षी मान्सून काळात सामान्य पाऊस होणार असा अंदाज दिला आहे.
यामुळे जर हा हवामान अंदाज खरा ठरला आणि या वर्षी सामान्य पाऊस पडला तर देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. अशातच मात्र देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत असून आगामी तीन दिवस काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, गारपीट आणि बर्फ वृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
याबाबत हवामान खात्याने सविस्तर माहिती दिली आहे. हवामान खात्याने म्हटल्याप्रमाणे उत्तराखंड, पंजाब, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, बिहार, चंदिगड, हरियाणा, उत्तर प्रदेश येथील काही भागांमध्ये आगामी तीन दिवस पाऊस बरसणार असा अंदाज आहे.
विशेष म्हणजे जम्मू-काश्मीर, लदाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथील काही भागांमध्ये हिमवृष्टी होईल अशी शक्यता आहे. याचा परिणाम म्हणून आपल्या महाराष्ट्रातील किमान तापमानात चढ-उतार होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील काही भागांमध्ये किमान तापमान 10°c च्या खाली आले होते. आता मात्र हे तापमान 10 अंश पेक्षा अधिक झाले आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी खानदेशमधील धुळे येथे सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली.
धुळ्यात 6.8 अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदवले गेले. गेल्या 24 तासात मात्र धुळे येथील किमान तापमान 10.9°c एवढे नोंदवले गेले आहे. दुसरीकडे राज्यातील उर्वरित भागांमध्ये किमान तापमान 10 ते 20 अंश सेल्सिअस दरम्यान असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
यामुळे थंडीचा कडाका थोडासा कमी झाला आहे. अशातच मात्र उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टी होण्याची शक्यता असल्याने राज्यातील किमान तापमान पुन्हा एकदा कमी होणार आणि थंडी वाढणार असे आय एम डी ने स्पष्ट केले आहे.
कुठं होणार गारपीट ?
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, लदाख, हिमाचल प्रदेश येथे मुसळधार पावसासह हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागात गारपिटीचा अंदाज देण्यात आला आहे.
तसेच पंजाब, चंदीगड, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार येथे हलका ते मध्यम पाऊस पडणार असा अंदाज आहे. त्यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी कृषी तज्ञांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.