Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रसहित देशातील अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढू लागला आहे. राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून किमान तापमानात मोठी घट पाहायला मिळत आहे. यामुळे थंडीचा जोर ही वाढू लागला आहे. अनेक भागात वाढत्या थंडीच्या तीव्रतेमुळे नागरिक हैराण आहेत.
अचानक थंडीची तीव्रता वाढली असल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, यामुळे सर्वसामान्यांनी काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे.
याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना मोठा फटका बसू शकतो. आगामी दोन ते तीन दिवस राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. खरे तर गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस झाला होता. यानंतर या चालू वर्षाची सुरुवात देखील अवकाळी पावसाने झाली. जानेवारी 2024 ची सुरुवात अवकाळी पावसाने झाली असून आता जानेवारी महिन्याची एंडिंग देखील अवकाळी पावसाने होणार असा अंदाज आहे.
यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या दोन्ही पिकांची शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
जानेवारीच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस बरसल्यानंतर आता मागील आठवडाभरापासून महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडत असल्याचे चित्र आहे.
मात्र, एकीकडे नागरिकांना हुडहुडी जाणवत असतानाच राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
आय एम डी ने म्हटल्याप्रमाणे, पुढील तीन दिवस मराठवाड्यासह विदर्भातील तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता तयार होत आहे. याशिवाय कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात चक्राकार वारे वाहत असल्याने राज्यात पावसासाठी पोषण वातावरण निर्माण झाले आहे. एकंदरीत गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला पावसाचा लहरीपणा अजूनही कायम आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. दरम्यान आता हवामान विभागाने वर्तवलेला हा अंदाज खरा ठरतो का आणि महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.