Maharashtra Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे. गेल्या महिन्यातील शेवटच्या आठवड्यात राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं होत.
काही भागात तर गारपीट देखील झाली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे वाया गेले.
अशातच, आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये दाट धुके पाहायला मिळत आहे. तसेच दव देखील पडू लागली आहे. वातावरणात धुक्याची दाट चादर तयार झाल्याने अन दव पडत असल्याने याचा पिकावर विपरीत परिणाम होणार आहे.
रब्बी हंगामातील पिके यामुळे प्रभावित होण्याची शक्यता असून विविध रोगांचा पिकांवर प्रादुर्भाव होऊ शकतो असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
अशा स्थितीत आता भारतीय हवामान विभागाने आज राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. म्हणजे अवकाळी पावसाचे सावट अजूनही राज्यावर कायमच आहे.
आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील उत्तर महाराष्ट्रात प्रामुख्याने अवकाळी पावसाची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रातुन मात्र अवकाळी पाऊस आता गायब होणार आहे.
कोणत्या जिल्ह्यात बरसणार पाऊस ?
गेल्या 24 तासात उत्तर महाराष्ट्रातील धुळे, अहमदनगर आणि मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यासह राज्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागली आहे.
विशेष म्हणजे आज देखील उत्तर महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, आज उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर आणि नाशिक या दोन जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.
उर्वरित राज्यात मात्र मुख्यतः कोरडे हवामान राहणार असे हवामान विभागाने सांगितले आहे. पण पावसाळी वातावरण आणि ढगाळ हवामान यामुळे राज्यातील उकाड्यात वाढ कायम आहे.
राज्यातील कमाल तापमान कमी होत आहे, पण किमान तापमान वाढू लागले आहे. याचा परिणाम म्हणून अजून राज्यात थंडीचा जोर पाहायला मिळत नाहीये. विशेष म्हणजे यंदा डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर कमीच राहणार असा अंदाज आहे.