Maharashtra Havaman Andaj : हवामान खात्याने भारतातून मान्सून परतला असल्याचे जाहीर केले आहे. तसेच आता देशातील विविध भागात थंडीची देखील चाहूल जाणवू लागली आहे. येत्या काही दिवसात थंडीची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवली जात आहे.
तर काही भागात अजूनही ऑक्टोबर हिट अनुभवायला मिळत आहे. ऑक्टोबर हिटमुळे अंगाची अक्षरशा लाहीलाही होत आहे. पण देशाच्या दक्षिण भागात आणि ईशान्य भारतात अजूनही काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. काही भागात मुसळधार पावसाची देखील हजेरी लागत आहे. सध्या दक्षिण आणि ईशान्य भारतात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे त्या ठिकाणी ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळत आहे.
विशेष बाब म्हणजे भारतीय हवामान खात्याने येत्या काही दिवसात देशातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. याबाबत हवामान विभागाने नुकताच एक महत्त्वाचा हवामान अंदाज जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी म्हणजेच येत्या दोन दिवसात केरळमध्ये पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.
याशिवाय ईशान्य भारतातील मिझोरम, नागालँड आणि मणिपूर या राज्यांमध्ये 24 ऑक्टोबरला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. यामुळे या संबंधित भागातील नागरिकांना ऑक्टोबर हिटपासून दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. उर्वरित राज्यात मात्र थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्लीचा विचार केला असता दिल्लीमध्ये पुढील दोन दिवस हलके धुके राहणार असा अंदाज आहे.
तसेच आज 21 ऑक्टोबर 2023 रोजी राजस्थान, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात मात्र उद्यापासून हळूहळू थंडीची तीव्रता वाढेल असे सांगितले जात आहे. याशिवाय, आज केरळ आणि लक्षद्वीप मध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज आहे.
तसेच आज आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, सिक्कीम आणि ईशान्य भारतात देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत, देशातील काही भागांमध्ये येत्या काही दिवसात स्वेटर घालण्यासारखी परिस्थिती तयार होणार आहे तर काही ठिकाणी रेनकोट घालावे लागतील असे चित्र आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात मात्र कुठेही पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे आता राज्यात येत्या काही दिवसांमध्ये थंडीची तीव्रता वाढेल असे मत व्यक्त होत आहे. काही हवामान शास्त्रज्ञांनी नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीचा जोर वाढू शकतो असे सांगितले आहे. यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना देखील लवकरच आता ऑक्टोबर इथपासून दिलासा मिळणार आहे.