Maharashtra Havaman Andaj : गेल्या 17 ते 18 दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या महिन्यात अर्थातच जुलै महिन्यात जोरदार पाऊस बरसला. कमी वेळेत अधिक पाऊस झाला. यामुळे जून महिन्यातील पावसाची तूट भरून निघाली. गेल्या महिन्यात विदर्भ आणि कोकणात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता.
मध्य महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील सरासरी एवढा पाऊस झाला होता. काही भागात गेल्या महिन्यातही चांगला पाऊस झाला नाही पण राज्यातील बहुतांशी भागात गेल्या महिन्यात चांगला पाऊस पडला.
यामुळे आता ऑगस्ट महिन्यातही चांगला पाऊस पडेल आणि खरीप हंगाम गेल्यावर्षीप्रमाणेच राहील म्हणजे चांगला पाऊस राहील अशी आशा शेतकऱ्यांना होती. पण आता गेल्या काही दिवसांपासून पावसाचा मोठा खंड पडला आहे. काल नागपूरसहित विदर्भात सर्वदूर पावसाची हजेरी पाहायला मिळाली.
त्यामुळे विदर्भातील सर्वसामान्य जनतेला तसेच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अधिक श्रावण महिना संपल्यानंतर निज श्रावण महिन्याच्या आगमना बरोबरच पावसाचे आगमन झाल्याने सध्या शेतकऱ्यांमध्ये मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
काल विदर्भासहित राज्यातील अनेक भागात पावसाने आपले श्रीमुख दाखवले आहे. पण शेतकऱ्यांना आता मोठ्या पावसाची नितांत गरज आहे. खरीप हंगामातील सोयाबीन कापूस तूर मका यांसारख्या सर्वच पिकांना आता मोठ्या मुसळधार पावसाची आवश्यकता आहे.
जोरदार पाऊस झाला तेव्हाच विहिरींना पाणी उतरेल आणि धरणांमधील जलसाठा वाढेल यामुळे जोरदार पाऊस झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवसाच्या हवामानाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
आय एम डी ने पुढील चार दिवस विदर्भात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता आय एम डी ने पुढील चार दिवस विदर्भाला येलो अलर्ट दिला आहे. यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून खरीप हंगामातील पिकांना नवीन जीवदान मिळेल असे सांगितले जात आहे.
विदर्भासहितच राज्यातील मराठवाडा आणि खानदेश विभागात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आय एम डी ने खानदेश मधील जळगाव तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद नांदेड परभणी आणि विदर्भातील सर्व 11 जिल्ह्यासाठी उद्या अर्थातच 19 ऑगस्ट रोजी पावसाचा येलो अलर्ट केला आहे.
हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे ही हवामान प्रणाली राज्यात पावसासाठी पोषक ठरणार आहे. यामुळे अधिक श्रावण मासात रजेवर असणारा पाऊस आता निज श्रावण मासात पुन्हा परतणार असे चित्र तयार होत आहे.
शुक्रवारपासून म्हणजे आजपासून विदर्भ, मध्य महाराष्ट्र अन् मराठवाड्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे. निश्चितच पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाला यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.