Maharashtra Havaman Andaj : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे भारतीय हवामान खात्याने येत्या काही तासात राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
सोबतच हवामान खात्याने महाराष्ट्रातून मान्सून कधी परतणार याबाबत देखील महत्त्वाची माहिती दिली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याचा परिणाम म्हणून येत्या 24 तासात दक्षिण कोकणात अर्थातच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुणे वेधशाळेतील हवामान तज्ञ शिल्पा आपटे यांनी महाराष्ट्र टाइम्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, काल अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. दरम्यान हे कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित झाले आहे. त्याचा प्रभाव म्हणून महाराष्ट्रात आणि गोव्यात पावसाची शक्यता आहे. आगामी 48 तासात राज्यातील कोकण विभागात आणि गोव्यात या क्षेत्राच्या प्रभावामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज आपटे यांनी व्यक्त केला आहे.
याचा प्रभाव दक्षिण मध्य महाराष्ट्रात देखील दिसेल आणि त्या ठिकाणी हवामान खराब होणार आहे. याचा परिणाम पुण्यावर देखील होणार आहे. पुण्यात अरबी समुद्रात तयार झालेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विजाच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याच्या तज्ञांनी व्यक्त केला आहे.
यासोबतच आपटे यांनी महाराष्ट्रातून चार ऑक्टोबर नंतर मान्सूनच्या परतीचा पावसाचा प्रवास सुरू होणार अशी माहिती दिली आहे. 4 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातील उत्तर भागातून मान्सून परतण्यास सुरुवात करणार अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.
यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस !
या चालू सप्टेंबर महिन्यात राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी लागली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिली होती मात्र चालू सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस बरसत आहे. गणेशोत्सवापासून राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडत असल्याने राज्यातील बळीराजाला थोडाफार दिलासा मिळाला आहे.
मात्र असे असले तरी यंदा राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे. साहजिकच याचा परिणाम चालू खरीप हंगामावर आणि आगामी रब्बी हंगामावर देखील होणार आहे. कमी पावसामुळे या वर्षी उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आहे.