Maharashtra Havaman Andaj 2024 : मार्च महिन्याच्या अखेरीस अवकाळी पावसाने दस्तक दिली. अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकाच्या काढणीसाठी लगबग करत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे काही प्रमाणात नुकसान केले. दुसरीकडे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील हवामान प्रामुख्याने कोरडे पाहायला मिळत आहे.
राज्यात कुठेच अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळालेली नाही. आता तापमानात पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असा अंदाज दिला आहे.
अशा परिस्थितीत आगामी मान्सून काळात पाऊसमान कसा राहणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जातोय. खरे तर गेल्या वर्षी एल निनोमुळे महाराष्ट्रासहित देशातील अनेक भागांमध्ये दुष्काळाचे सावट पाहायला मिळाले.
दुष्काळामुळे शेती क्षेत्राला मोठा फटका बसला. कमी पावसामुळे शेतकऱ्यांना गेल्यावर्षी अपेक्षित असे उत्पादन मिळाले नाही. परिणामी यंदा कसा मान्सून राहणार यावरच शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
अशातच आता मान्सूनबाबत अनेक जागतिक हवामान संस्थेनंतर भारतीय हवामान विभागाने देखील मोठी अपडेट दिले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पॅसिफिक महासागरातल्या एल निनोचा जगभरातल्या हवामानावर आणि भारतातल्या मान्सूनवर परिणाम होतो.
एलनिनो आल्यानंतर भारतात दुष्काळाची परिस्थिती तयार होते. ज्यावर्षी एल निनो येतो त्यावर्षी हमखास कमी पाऊस बरसतो हे अनेकदा समोर आले आहे. गेल्या वर्षी देखील एलनिनोचे सावट होते आणि याचा परिणाम म्हणून भारतावर दुष्काळाचे सावट पाहायला मिळाले.
सलग तीन वर्ष दडी मारल्यावर एल निनो 2023 मध्ये प्रकटला होता. तेव्हापासून जगभरात अनेक ठिकाणी तापमानानं नवीन उच्चांक गाठला आहे. पण आता एल निनो कमकुवत होत असून ही देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज राहणार आहे. 2024 या वर्षाच्या सुरुवातीलाच एल निनो कमजोर झाला आहे.
जागतिक हवामान संघटनेच्या अनेक तज्ज्ञांनी अस म्हटलं आहे. विशेष बाब अशी की आता जागतिक हवामान संघटनेच्या तज्ज्ञांच्या या अंदाजाला भारतीय हवामान विभागानंही दुजोरा देण्याचे काम केले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, एल निनो सध्या मध्यम स्वरुपात असून, तो येत्या काळात कमकवूत होत जाईल आणि मान्सूनच्या मध्यावर ला निनाचा प्रभाव जाणवू लागणार आहे. एल निनो सारखाच हिंद महासागरातला इंडियन ओशन डायपोल अर्थात IOD हा घटक देखील मान्सूनवर परिणाम करत असतो. इंडियन ओशन डायपोल जेव्हा सकारात्मक असतो तेव्हा भारतात चांगला मान्सून होत असतो.
सध्या IOD सम स्थितीत (न्यूट्रल) असून मान्सून सुरू झाल्यावर तो पॉझिटिव्ह होणार अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे यंदा चांगला पाऊस होणार आहे. असे घडल्यास यावर्षी मान्सून काळात सरासरी पेक्षा अधिकचा पाऊस बरसणार असे मत जाणकार लोकांनी व्यक्त केले आहे.