Maharashtra Havaman Andaj 2024 : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. ही बातमी भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून समोर येत आहे. खरेतर गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राज्यात सातत्याने अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात देखील अवकाळी पाऊस झाला होता. त्यावेळी काही ठिकाणी गारपीट सुद्धा झाली.
मार्च महिन्याची सुरुवात देखील अवकाळी पावसाने आणि गारपीटीने झाली आहे. यामुळे रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा पिकाला मोठा फटका बसला.
विशेष म्हणजे आता पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसासाठी आणि गारपिटीसाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज समोर आला आहे.
16 मार्चपासून पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे जर हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पुन्हा एकदा नुकसान होऊ शकते अशी भीती आता व्यक्त होत आहे.
खरेतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामान कोरडे आहे. राज्यातील अनेक भागात तापमान 38 ते 40°c पर्यंत पोहोचले आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामानात बदल होईल आणि अवकाळी पावसाला सुरुवात होईल असा अंदाज समोर आला आहे.
दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या जिल्ह्यात हवामान खात्याने अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता वर्तवली आहे हे थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या जिल्ह्यात अवकाळी पाऊस होणार ?
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात उद्या हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 17 मार्चला अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
याशिवाय नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात 17 तारखेला गारपीट होईल असा देखील अंदाज समोर आला आहे. तसेच 18 मार्चला भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
विशेष बाब अशी की विदर्भातील या संबंधित जिल्ह्यांना हवामान खात्याने अवकाळी पावसाची शक्यता लक्षात घेता येलो अलर्ट दिला आहे. यामुळे या सदर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.