Maharashtra Government Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील विविध घटकांसाठी अनेक कौतुकास्पद योजना राबवल्या जात आहेत. यामध्ये महिलांसाठी देखील अनेक योजना सुरू झाल्या आहेत. वर्तमान शिंदे-फडणवीस-पवार सरकारने देखील सत्ता स्थापित केल्यापासून अनेक महिला हिताच्या योजना सुरू केल्या आहेत.
यामध्ये राज्यातील मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेचा देखील समावेश होतो. या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींना 1 लाख 1 हजार रुपयांपर्यंतचा लाभ दिला जाणार आहे.
विशेष म्हणजे या योजनेसाठी नुकताच राज्य शासनाने निधीदेखील उपलब्ध करून दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाच मार्च 2024 रोजी राज्य शासनाने लेक लाडकी योजनेसाठी 19 कोटी 70 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
हा निधी एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय नवी मुंबई मार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा निधी राज्यातील 36 जिल्ह्यांसाठी उपलब्ध झालेला आहे.
म्हणजेच ही योजना राज्यातील सर्वच्या-सर्व 36 जिल्ह्यांमध्ये राबवली जात आहे. जिल्हास्तरावर आणि तालुका निहाय कॅम्प आयोजित करून या योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.
या योजनेचा लाभ एक एप्रिल 2023 नंतर जन्माला आलेल्या मुलींना मिळणार आहे. दरम्यान, याचा लाभ मिळवण्यासाठी जवळच्या बालविकास प्रकल्प कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अशा परिस्थितीत, आता आपण या योजनेचे स्वरूप थोडक्यात पाहणार आहोत. या योजनेचा लाभ कोणत्या कुटुंबातील मुलींना मिळणार आहे हे आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत.
योजनेचे स्वरूप कसे आहे
या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये, मुलगी इयत्ता पहिली ला गेल्यावर सहा हजार रुपये, सहावीत गेल्यानंतर 7000 रुपये, अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये, तसेच मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 75 हजार रुपये दिले जाणार आहेत. अर्थातच या लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र मुलींना अठरा वर्षापर्यंत एक लाख एक हजार रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळणार आहे.
कोणाला मिळणार लाभ ?
या योजनेअंतर्गत एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला आलेल्या पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींना दिला जाणार आहे. कुटुंबातील एक अथवा दोन मुली या योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील.
कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला ही योजना लागू राहणार आहे. ज्या कुटुंबाचे एक लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न आहे त्याच कुटुंबातील मुलींना याचा लाभ मात्र मिळणार आहे.