Maharashtra Government Scheme : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकातील नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य शासनाने महिला, जेष्ठ नागरिक, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगार अशा विविध घटकातील नागरिकांसाठी शेकडो योजना सुरू केल्या आहेत.
शिंदे सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना, अन्नपूर्णा योजना अशा कौतुकास्पद योजना सुरू केल्या आहेत. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी देखील राज्य सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत. मुलींना मोफत उच्च शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी देखील सरकारने नुकतीच नवीन योजना सुरु केली आहे.
याशिवाय राज्य सरकारच्या एका योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 51 हजार रुपयांची आर्थिक मदत देखील केली जात आहे. या योजनेला स्वाधार योजना असे नाव देण्यात आले आहे. दरम्यान, आता आपण या योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
कशी आहे ही योजना?
स्वाधार योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत पुरवली जात आहे. या अंतर्गत शैक्षणिक खर्चासाठी विद्यार्थ्यांना 51,000 ची मदत दिली जात आहे. खरेतर आर्थिक कारणांमुळे राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागले आहे.
यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये यासाठी शासनाने ही स्वाधार योजना सुरू केली आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना फक्त आर्थिक कारणांमुळे शिक्षणापासून दूर राहावे लागू नये यासाठी सरकार प्रयत्नशील असून ही योजना याचाच एक भाग आहे.
या योजनेचा लाभ अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना दिला जात आहे. दहावी आणि बारावीनंतर दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या कोणत्याही कोर्समध्ये ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
मात्र याचा लाभ ज्या विद्यार्थ्यांना 60 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत अशाच विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तसेच या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. म्हणजेच दुसऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
स्वाधार योजनेअंतर्गत बोर्डिंगच्या सुविधेसाठी २८ हजार रुपये दिले जातात. लॉजिग सुविधेसाठी १५ हजार रुपये दिले जातात. तसेच मेडिकल, इंजिनियरिंग कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त पाच हजार रुपये मिळतात.
जर तुम्हीही या योजनेच्या लाभासाठी पात्र असाल आणि यासाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुमचे बँकेत अकाउंट असणे आवश्यक राहणार आहे. कारण की या योजनेअंतर्गत मिळणारे पैसे हे थेट तुमच्या बँक खात्यात येणार आहेत. म्हणजेच डीबीटी अंतर्गत थेट लाभार्थ्यांना पैसे दिले जाणार आहेत.
अर्ज कसा करणार ?
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज हा विहित नमुन्यातच करावा लागेल. जर तुम्हाला या योजनेचा विहित नमुन्या मधील अर्ज हवा असेल तर महाराष्ट्र समाज कल्याण विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
यानंतर, होम पेजवर असलेला स्वाधार योजनेचा फॉर्म डाउनलोड करावा लागेल. मग तुम्हाला त्या फॉर्ममध्ये आवश्यक माहिती आणि कागदपत्रे जोडावी लागतील. त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळील समाज कल्याण कार्यालयात जमा करावा लागेल. एकदा तुमचा अर्ज जमा झाला की अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.