Maharashtra Government Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून समाजातील सर्वच घटकांसाठी विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. राज्यातील महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, कष्टकरी शेतमजूर, कर्मचारी अशा विविध घटकांसाठी नानाविध योजना शासनाच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत.
दरम्यान 5 फेब्रुवारी 2024 ला झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी अशीच एक महत्त्वकांक्षी योजना राबवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
शिंदे सरकारने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेस मान्यता देण्याचा मोठा निर्णय कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे.
या योजनेअंतर्गत 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपयाचा लाभ दिला जाणार आहे. दरम्यान आता आपण शिंदे सरकारने नव्याने जाहीर केलेल्या या योजनेची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी आहे योजना ?
दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य शासनाच्या या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या महत्त्वाकांशी योजनेअंतर्गत ज्येष्ठांमध्ये अपंगत्व, अशक्तपणा याचे निराकारण करण्यासाठी आवश्यक उपकरणे खरेदी करणे तसेच मानसिक स्वास्थ संतुलित ठेवण्यासाठी मनस्वास्थ्य केंद्रे व योगोपचार केंद्रांद्वारे प्रबोधन व प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
या योजनेअंतर्गत आरोग्य विभागांमार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण व स्क्रिनींग करण्यात येऊन लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येईल आणि पात्र लाभार्थ्यांना तीन हजार रुपये एकरकमी लाभ दिला जाणार आहे. हा लाभ संबंधित पात्र ज्येष्ठ नागरिकांच्या त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
योजनेसाठी किती कोटींची तरतूद
या योजनेसाठी महाराष्ट्र राज्य शासनाने 480 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या सव्वा ते दीड कोटींच्या घरात आहे.
यात अपंगत्व आणि मानसिक अस्वास्थ्याने जवळपास 15 लाख जेष्ठ नागरिक पीडित आहेत. दरम्यान याच 15 लाख ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
ही योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळणार अशी आशा व्यक्त होत आहे.