Maharashtra Government Scheme : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची मोठी चर्चा सुरू आहे. या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात झाली आहे. यासाठी एक जुलैपासून अर्ज भरणा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्थातच या योजनेसाठी अर्ज करण्यास आणखी एका महिन्याची मुदत आहे. या लाडकी बहिण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत.
राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परीत्यक्त्या आणि निराधार महिलांना या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा लाभ अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिलांना दिला जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेनंतर आता बृहन्मुंबई महानगरपालिकेने देखील आपल्या कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी एक अतिशय कौतुकास्पद योजना सुरू केली आहे.
मुंबई महापालिकेने धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य नामक एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील दिव्यांग नागरिकांना 1000 पासून ते 3000 रुपयांपर्यंत प्रति महिना मदत दिली जाणार आहे. ही मदत 40 ते 80 टक्के दिव्यांग असणाऱ्यांना मिळणार आहे.
या योजनेच्या माध्यमातून 2028-29 पर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे. पण याचा लाभ मिळवण्यासाठी सदर दिव्यांग व्यक्तीकडे पिवळे अथवा निळे वैश्विक ओळखपत्र (UIAD CARD) असणे आवश्यक राहणार आहे. मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ज्या दिव्यांग व्यक्तीकडे हे कार्ड असेल त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकणार आहे.
ही योजना पाच वर्षांसाठी सुरू राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या योजनेचा पुढील पाच वर्षांसाठी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात येणाऱ्या जवळपास 60000 दिव्यांग बांधवांना फायदा होणार आहे.
कसे आहे योजनेचे स्वरूप?
मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील कायमस्वरूपी रहिवासी असणाऱ्या दिव्यांगांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. अठरा वर्षांपेक्षा अधिक वय असणारे आणि 40 टक्के अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याला एक हजार रुपयांची मदत मिळणार आहे.
तसेच अठरा वर्षांपेक्षा अधिक वय असणारे आणि 80 टक्के अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींना प्रत्येक महिन्याला तीन हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. हा लाभ प्रत्येक सहा महिन्यांनी एकत्रितरित्या दिला जाणार आहे.
म्हणजेच ज्या लोकांना 40% अपंगत्व आहे त्यांना प्रत्येक सहा महिन्यांनी सहा हजार रुपये आणि 80 टक्के अपंगत्व आहे त्यांना प्रत्येक सहा महिन्यांनी 18 हजार रुपये मिळणार आहेत. अर्थातच 40% अपंगत्व असणाऱ्या नागरिकांना वार्षिक बारा हजार रुपये आणि 80 टक्के अपंगत्व असणाऱ्या नागरिकांना वार्षिक 36 हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे.
अर्ज कुठं करणार?
या योजनेसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यास अंतिम मुदत नाही. मुंबई महानगरपालिकेतील संबंधित विभागात कधीही सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
या योजनेचा अर्ज हा मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हा अर्ज डाऊनलोड करून त्याची प्रिंट आउट घेऊन हा अर्ज काळजीपूर्वक भरून मुंबई महानगरपालिकेतील संबंधित विभागात आवश्यक कागदपत्रांसहित जमा करायचा आहे.