Maharashtra Government Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य गरजू नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून केला जात आहे. यामध्ये महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी देखील अनेक महत्त्वाच्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात असून या योजनेच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक हित जोपासण्याचा प्रयत्न होत आहे. दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील महिलांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे.
ती म्हणजे जिल्ह्यातील महिलांना आता 90 टक्के अनुदानावर पिठाची गिरणी उपलब्ध होणार आहे. याशिवाय पिको व फॉल मशीन देखील जिल्ह्यातील गरजवंत महिलांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. यासाठी अर्ज देखील सुरू झाले आहेत.
महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद बुलढाणा या अंतर्गत महिलांना पिठाची गिरणी आणि पिको व फॉल मशीन उपलब्ध करून दिले जाणार आहे. दरम्यान आज आपण या योजनेची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कोणाला मिळणार लाभ ?
मिळालेल्या माहितीनुसार पिठाच्या गिरणी योजनेसाठी फक्त आणि फक्त अपंग महिला व मुलींना अर्ज करता येणार आहे. इतर सर्वसामान्य महिलांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही. दुसरीकडे पिको व फॉल मशीन या योजनेसाठी इतर महिला देखील पात्र राहणार आहेत.
यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील पात्र महिलांना या दोन्ही योजनेसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेसाठी 17 ते 45 वयोगटातील महिला पात्र राहतील.
गेल्या पाच वर्षात सदर अर्जदाराने संबंधित बाबीचा लाभ घेतलेला नसावा. शासकीय सेवेत असलेल्या अर्जदाराला याचा लाभ मिळणार नाही. तसेच अर्जदाराच्या कुटुंबातील एखादा सदस्य शासकीय सेवेत असल्यास याचा लाभ मिळणार नाही.
अर्ज कुठे करावा, आवश्यक कागदपत्रे कोणती
या योजनेसाठी महिला व बालकल्याण विभाग बुलढाणा येथे अर्ज सादर करायचे आहे. अर्ज हा विहित नमुन्यात भरून सादर करायचा आहे. या योजनेसाठी अर्ज करताना काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.
यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, शौचालयाबाबतचा ग्रामसेवक यांचा दाखला, पंचायत समिती विस्तार अधिकारी यांचे प्रमाणपत्र, गटविकास अधिकारी यांचे अभिप्राय प्रमाणपत्र हे कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. तसेच अर्जदाराचा वयाचा दाखला किंवा TCची छायांकित प्रत, उत्पन्न दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक, विज बिल यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे देखील सादर करावे लागणार आहेत.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
या योजनेसाठी पात्र महिलांना 22 फेब्रुवारी 2024 पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज आणि कागदपत्रां सहित अर्ज सादर करायचा आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने महिला व बालकल्याण विभागाच्या कार्यालयात सादर करायचा आहे.