Maharashtra Gharkul Yojana : केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब कुटुंबांना मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. ज्या लोकांना अद्याप हक्काचे घर नाही अशा लोकांसाठी विशेष घरकुल योजना राबवल्या जात आहेत.
केंद्र शासनाच्या माध्यमातून पीएम आवास योजनेअंतर्गत देशभरातील पात्र नागरिकांना घरकुल उपलब्ध करून दिले जात आहे. याशिवाय, राज्य शासनाकडून अशा काही योजना चालवल्या जात आहेत. राज्यात अनुसूचित जमाती म्हणजेच आदिवासी बांधवांसाठी शबरी आवास योजना सुरू करण्यात आली आहे.
यासोबतच महाराष्ट्रात ज्या लोकांना अजून हक्काचे घर नाही अशा लोकांसाठी रमाई आवास योजना राबवली जात आहे. दरम्यान आज आपण रमाई आवास योजना या विशेष घरकुल योजनेबाबतची अधिकची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
ही योजना नेमकी कोणत्या प्रवर्गातील नागरिकांसाठी आहे, कोणत्या समाजातील लोकांना या योजनेचा फायदा होतो, या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना घर बांधण्यासाठी किती अनुदान मिळते, अर्ज कुठे आणि कसा सादर करावा लागतो? अशा काही महत्त्वाच्या बाबी आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
कसे आहे रमाई आवास योजनेचे स्वरूप
रमाई आवास योजना ही महाराष्ट्र राज्य शासनाची घरकुल योजना आहे. ही योजना राज्यशासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ग्रामीण व शहरी भागात राबवली जाते. या योजनेअंतर्गत फक्त आणि फक्त अनुसूचित जातीच्या नागरिकांना घर उभारण्यासाठी अनुदान दिले जाते.
दरम्यान राज्याच्या समाज कल्याण विभागामार्फत या योजनेसाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांनी अधिकाधिक अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. ही योजना 2008 पासून राबवली जात आहे. ग्रामीण व शहरी भागांमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांना स्वतःच्या जागेवर अथवा कच्च्या घरांच्या ठिकाणी पक्के घर निर्माण करण्यासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
कोण राहते पात्र?
ग्रामीण भागातील एक लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना याचा लाभ मिळतो. तसेच शहरी भागातील तीन लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या नागरिकांना याचा लाभ मिळतो.
या योजनेसाठी फक्त आणि फक्त अनुसूचित जाती म्हणजेच एस सी कॅटेगिरी मधील नागरिक अर्ज करू शकतात. इतर प्रवर्गातील नागरिकांसाठी ही योजना नाही. याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील रहिवाशांना मिळतो. इतर राज्यातील रहिवाशांना याचा लाभ मिळू शकत नाही.
किती अनुदान मिळते
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य शासनाच्या या महत्त्वाकांशी घरकुल योजनेअंतर्गत या विशेष प्रवर्गातील नागरिकांना ग्रामीण भागात घरकुल बांधण्यासाठी प्रती घरकुल (शौचालय बांधकामासह) १ लाख ३२ हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते. शहरी भागाबाबत बोलायचं झालं तर शहरी भागातील लाभार्थ्यांना प्रति घरकुल २ लाख ५० हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते.
अर्ज कुठे करावा लागतो?
जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल आणि अर्ज करू इच्छित असाल तर तुम्हाला ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे. जे नागरिक शहरी भागात वास्तव्याला आहेत त्यांनी संबंधित महानगरपालिका कार्यालय, नगर परिषद किंवा नगर पंचायत कार्यालयात रमाई आवास योजनेसाठी अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जे नागरिक ग्रामीण भागात वास्तव्याला आहेत त्यांनी पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज करावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.