Maharashtra Farmer Success Story : शेतीचा व्यवसाय हा गेल्या काही वर्षांमध्ये मोठा आव्हानात्मक बनला आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी मोठा घातक ठरत आहे. अवकाळी, अतिवृष्टी, ढगाळ हवामान, गारपीट अन दुष्काळ अशा असंख्य संकटांमुळे शेतकरी राजा अक्षरशः बेजार झाला आहे. मात्र या अशा संकटांवर मात करत महाराष्ट्रातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने चांगले उत्पन्न मिळवले आहे.
जाफराबाद तालुक्यातील दहिगाव येथील एका शेतकऱ्याने चक्क सिडलेस लिंबूची यशस्वी शेती करून दाखवली आहे. सध्या या सीडलेस लिंबूंची फळबाग फळांनी लगडली असून, संपूर्ण तालुक्यात या नव्या प्रयोगाची आणि सदर शेतकऱ्याचे कौतुक केले जात आहे. हा सिडलेस लिंबू लागवडीचा विषय सध्या परिसरात कौतुकाचा ठरला असून या लिंबू बागेतून सध्या एका तोडणीत ४०० क्विंटल लिंबू काढले जात आहेत.
सेवानिवृत्त मुख्याध्यापक शंकरराव लहाने यांनी ही किमया साधली आहे. शंकरराव लहाने यांनी शिक्षकाची नोकरी करताना विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार केलेत, लहाने यांनी आपल्या शैक्षणिक कारकीर्दीत अनेकांच्या पिढ्या घडवल्यात अन आता रिटायरमेंट नंतर ते आपला पूर्ण वेळ शेतीला देत आहेत.
ते आपल्या शेतीत विविध प्रयोग करत असून त्यांच्या प्रयोगाची पंचक्रोशीत विशेष चर्चा आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक लहाने यांचा लिंबू फळबागेचा हा अभिनव उपक्रम फक्त स्थानिक शेतकऱ्यांमध्येच कौतुकाचा विषय राहिलेला नाही तर या बागेला रशिया येथील एका उद्योजक शेतकऱ्याने भेट देऊन बागेचे कौतुक केले.
म्हणजेचं त्यांच्या शेतीमालया या प्रयोगाची सातासमुद्रा पार सुद्धा चर्चा होणार आहे. लहाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांपूर्वी त्यांनी पावणेतीन एकर क्षेत्रात २ हजार सीडलेस लिंबूंची झाडे लावली. तसेच मागील दोन वर्षांपासून या बागेतुन त्यांना उत्पन्न मिळतं आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये त्यांना या बागेतून अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही.
मात्र, यावर्षी प्रथमच ही फळबाग लिंबूंनी पूर्णतः लगडली आहे. सध्या या बागेतून एका तोडणीत जवळपास ४०० क्विंटल माल काढला जात आहे. यामुळे त्यांना सिडलेस लिंबू लागवडीतून चांगली कमाई होणार आहे. नक्कीच सेवानिवृत्त मुख्याध्यापक लहाने यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी देखील मार्गदर्शक ठरणार आहे.