Maharashtra Farmer Scheme : नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिंदे सरकारने राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा झाली. विशेष म्हणजे या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे सध्या या योजनेची संपूर्ण राज्यभर चर्चा सुरू आहे.
राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी सुद्धा अनेक मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही देखील अशीच एक योजना आहे. दरम्यान या योजनेचा देखील शासन निर्णय आता निर्गमित करण्यात आला आहे.
या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षांसाठी मोफत वीज दिली जाणार आहे. मात्र याचा लाभ जे शेतकरी साडेसात एचपी पर्यंतचा कृषी पंप वापरतात त्यांनाच मिळणार आहे.
म्हणजेच साडेसात एचपी पेक्षा जास्त क्षमतेचा कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. खरे तर राज्यात साडेसात एचपी पर्यंतच्या कृषी पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.
त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या या योजनेचा राज्यातील लाखो शेतकऱ्यांना फायदा मिळणार आहे. सरकारने सांगितल्याप्रमाणे या योजनेमुळे राज्यातील 44 लाख शेतकरी लाभान्वित होणार आहेत.
विशेष बाब अशी की या योजनेची अंमलबजावणी ही एप्रिल 2024 पासून केली जाणार आहे. अर्थातच एप्रिल महिन्यापासून शेतकऱ्यांचे विज बिल माफ होणार आहे. ही योजना 2029 पर्यंत सुरू ठेवली जाणार आहे. तथापि आगामी तीन वर्षानंतर या योजनेचा आढावा घेतला जाणार आहे.
यानंतर मग ही योजना पुढे सुरू ठेवायची की नाही याबाबतचा निर्णय होणार आहे. ही योजना राबवण्याची जबाबदारी ही महावितरणची राहणार असे या जीआर मध्ये म्हटले गेले आहे.
यासाठी सरकारच्या तिजोरीवर 14760 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. मात्र, सरकार आधीच शेतकऱ्यांना वीज सवलतीसाठी 7000 कोटी रुपयांपर्यंतचा खर्च करत आहे.
म्हणजेच सरकारला या योजनेसाठी अतिरिक्त 7000 कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. एकंदरीत मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा जीआर आता निर्गमित झाला असून याचा लाभ एप्रिल 2024 पासून शेतकऱ्यांना होणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या या निर्णयाचे कौतुक करण्यात आले असून यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.