Maharashtra Farmer Scheme : महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत शेकडो योजना राबविण्यात आल्या आहेत. या योजनांमुळे शेती क्षेत्राला मोठी उभारी मिळाली आहे. अशातच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने एक मोठी घोषणा केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना शिंदे सरकारकडून लवकरच प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. यासाठी शिंदे सरकारकडून महत्त्वाचे आदेश देण्यात आले आहेत.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सरकारने हा निर्णय राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर घेतला आहे. नुकतेच राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावरच राज्यातील काजू उत्पादक आक्रमक झाले असल्याने सरकार थोडेसे बॅक फुटवर गेले आहे. सरकारला आता राज्यातील काजू उत्पादकांच्या प्रश्नांबाबत खडबडून जाग आली आहे.
महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि कोल्हापूर या प्रमुख काजू उत्पादक जिल्ह्यांमधील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून प्रोत्साहन पर अनुदान दिले जाईल असे संकेत दिले आहेत.
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार गोवा राज्याच्या धर्तीवर हे अनुदान शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे. विशेष म्हणजे याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश राज्याचे पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत.
पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी विधान भवनात काजू उत्पादकांच्या प्रश्नांसंदर्भात नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेतली आहे.
दरम्यान याच बैठकीत काजू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री महोदय यांनी संबंधितांना प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रोत्साहनपर अनुदानाबाबत हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या तीन वर्षात पिकासाठी झालेला खर्च आणि हाती आलेले उत्पन्न याचा आढावा घेऊन राज्यातील काजू उत्पादकांना हे प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार आहे.
यामुळे कोकणातील आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असा आशावाद व्यक्त होत आहे.