Maharashtra Farmer Scheme : शेतीचा व्यवसाय हा आधीच्या तुलनेत शेतीचा व्यवसाय थोडासा सोपा झाला आहे. पूर्वी शेतीची संपूर्ण कामे मनुष्यबळाने करावी लागत. यामुळे शेतकऱ्यांचा अधिकचा वेळ, कष्ट आणि पैसे खर्च करावे लागत असत. तुलनेने उत्पन्न मात्र कमी मिळत असत. वेळेवर शेतीची कामे होत नसल्याने शेतीमधून उत्पादन कमी मिळेल आणि साहजिकच यामुळे हातात येणारा पैसा देखील घटत असे.
आता मात्र परिस्थिती बदलली आहे. यांत्रिकीकरणामुळे शेतीचा व्यवसाय सोपा झाला आहे.मात्र यांत्रिकीकरण हे शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असले तरी देखील सुरुवातीला यासाठी मोठा पैसा खर्च करावा लागतो.
यामुळे सर्वच शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचा फायदा होतोय असे नाही.आता शेतीमध्ये ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर चलित यंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय. या यंत्रांमुळे उत्पादनात वाढ झाली आहे. ट्रॅक्टरमुळे घंटो का काम काही मिनिटात केले जात आहे यात शंकाच नाही.
परंतु ट्रॅक्टर खरेदी करणे सर्वच शेतकऱ्यांना जमत नाही. यामुळे ट्रॅक्टर खरेदीसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. यामध्ये मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना तब्बल 90 टक्क्यांपर्यंतचे अनुदान दिले जात आहे.
म्हणजेच शेतकऱ्यांना अवघे 35 ते 40 हजार रुपये खर्च करून मिनी ट्रॅक्टर खरेदी करता येणे शक्य होत आहे. अशा परिस्थितीत, आज आपण महाराष्ट्र राज्य मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना नेमकी आहे तरी कशी याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
काय आहे ही योजना
ही योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू झालेली आहे. या अंतर्गत ट्रॅक्टर व इतर कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदान मिळते. ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून राबवली जाते. ही मिनी ट्रॅक्टर अनुदान योजना राज्यातील सर्वच शेतकऱ्यांसाठी राबवली जात नाही.
याचा लाभ काही मोजक्याच शेतकऱ्यांना मिळतो. या अंतर्गत मिनी ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना 90% एवढे अनुदान मिळते आणि उर्वरित दहा टक्के एवढा पैसा स्वतः शेतकऱ्यांना खर्च करावा लागतो. या अंतर्गत दिले जाणारे हे अनुदान बचत गटांना दिले जाते.
कोणाला मिळतो लाभ
महाराष्ट्र राज्य शासनाने सुरू केलेल्या या योजनेचा लाभ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील बचत गटातील शेतकऱ्यांना मिळतो. याचा लाभ इतर शेतकऱ्यांना मिळत नाही. सदर नवबौद्ध प्रवर्गातील बचत गटात किमान 90% अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील सदस्य असणे आवश्यक असते.
या अंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी 90% आणि कमाल तीन लाख 15 हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान मिळते. उर्वरित दहा टक्के एवढा निधी स्वतः शेतकऱ्यांना भरावा लागतो.
कोण-कोणती कागदपत्रे लागतात ?
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, मतदान कार्ड, मोबाईल नंबर, बँक पासबुकची प्रत, जात प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा अशी महत्त्वाची कागदपत्रे शेतकऱ्यांना सादर करावी लागतात. या योजनेबाबत अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक शेतकरी समाज कल्याण विभागाला भेट देऊ शकतात.