Maharashtra Farmer Scheme : मार्च महिन्यात झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात वर्तमान शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा योजना राबवण्याचा एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेतला. तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधिमंडळात ही महत्त्वाची घोषणा केली होती.
एक रुपयात पिक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेतल्याने राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. ही शासनाने अलीकडेच घोषित केलेली योजना या खरीप हंगामापासून राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचा केवळ एक रुपयात विमा उतरवला जाणार आहे.
खरंतर याआधी पिक विमा योजनेअंतर्गत पिकाचा विमा काढण्यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि शेतकरी मिळून विम्याचा प्रीमियम भरला जात असे. मात्र आता शेतकरी हिश्याची रक्कम राज्य शासन भरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजनेअंतर्गत पिकाचा विमा उतरवता येणार आहे.
निश्चितच शासनाचा हा निर्णय राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे. असं सांगितलं जाते की एक रुपयात पिक विमा योजना ही माजी कृषिमंत्री आणि वर्तमान पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या कल्पनेतून राबवली जात आहे. अशातच आता पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.
अब्दुल सत्तार यांनी नुकतीच राज्यातील धनगर समाजासाठी एक महत्त्वाची घोषणा करत आता एक रुपयात पिक विमा योजनेच्या धर्तीवर मेंढ्यांचा देखील एक रुपयात विमा उतरवला जाणार असल्याचे जाहीर केले आहे. धनगर समाजाला दिलासा देण्यासाठी मेंढ्यांचा 1 रुपयांत विमा काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा यावेळी सत्तार यांनी केली आहे.
सिल्लोड येथे राज्यव्यापी धनगर समाज निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात बोलतांना त्यांनी ही घोषणा केली आहे. तसेच धनगर समाजाच्या विविध प्रलंबित मागण्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक घेणार अशी ग्वाही देखील यावेळी सत्तार यांनी दिली आहे.