Maharashtra Farmer Scheme : महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे एक रुपयात पिक विमा योजने संदर्भात. खरे तर गेल्या वर्षापासून राज्यात एक रुपयात पिक विमा योजना राबवली जात आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना फक्त एक रुपया भरून पिकाचा विमा काढून दिला जात आहे.
म्हणजे पीक विमा साठी आवश्यक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या हिश्याची रक्कम राज्य शासन स्वतः भरत आहे. यामुळे, महाराष्ट्रात पिक विमा योजनेला चांगला प्रतिसादही मिळू लागला आहे. दरम्यान, राज्यातील शिंदे सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत एक रुपयात पिक विमा योजना याही हंगामात राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
पण, या योजनेसाठी शेतकऱ्यांना 15 जुलैपर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली होती. मात्र या मुदतीत अनेक शेतकऱ्यांना पिक विमा काढता आला नाही.
काही तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना मुदतीत पिक विमा काढता आला नाही. परिणामी शेतकऱ्यांच्या माध्यमातून पिक विमा योजनेला मुदत वाढ दिली गेली पाहिजे अशी मोठी मागणी केली जात होती.
या पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्राकडे पाठपुरावा सुरू केला होता. त्यांनी केंद्रीय कृषिमंत्री आणि मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे या संदर्भात पाठपुरावा केला.
दरम्यान राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा हा पाठपुरावा आता यशस्वी झाला असून एक रुपयात पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा भरण्यासाठी आता राज्यातील शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय केंद्राकडून घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शासनाच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आता राज्यातील शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजनेअंतर्गत पिक विमा भरण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत वाढ मिळाली आहे म्हणजेच शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत पिक विमा भरता येणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की आज 15 जुलै 2024, सोमवारी सायंकाळी एक रुपयात पिक विमा भरण्याची मुदत पंधरा दिवसांनी वाढवण्यात आली आहे. यानुसार आता 31 जुलै पर्यंत पिक विमा भरता येणार आहे.
याबद्दल कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून राज्यातील शेतकऱ्यांना माहिती दिली आहे. तसेच कृषी मंत्री मुंडे यांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे शेतकऱ्यांची मोठी मागणी मान्य केल्यामुळे आभार मानले आहेत.