Maharashtra Farmer Scheme : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना यांची मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. लाडकी बहिण योजना ही राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जाणार आहेत. यासोबतच लाडका भाऊ योजना जाहीर करण्यात आली आहे या अंतर्गत पात्र तरुणांना दहा हजार रुपयांपर्यंतचा आर्थिक लाभ दिला जाणार आहे.
यामुळे सध्या महाराष्ट्रात या दोन्ही योजनांची मोठी चर्चा सुरु आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारने या योजनांची घोषणा केली आहे. दुसरीकडे, आता शेतकऱ्यांसाठी देखील शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेत शिंदे सरकारने मोठा बदल केला आहे. या अंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. दरम्यान आज आपण राज्य मंत्रिमंडळाच्या या महत्त्वाच्या बैठकीत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात किती वाढ करण्याचा निर्णय झाला आहे याबाबत आढावा घेणार आहोत.
किती अनुदान मिळणार?
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत आधी विहिरीसाठी अडीच लाख रुपये आणि जुन्या विहिरीसाठी 50 हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते. मात्र आता शिंदे सरकारने या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याने आता नवीन विहिरीसाठी चार लाख रुपये आणि जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे.
तसेच इनवेल बोअरिंगचे अनुदान २० हजारांवरून ४० हजार, यंत्रसामग्रीसाठी ५० हजार रुपये, परसबागेकरिता पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्तरीकरणासाठी एक लाख रुपये अनुदान देण्यात येत होते पण ते आतां प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के किंवा २ लाख यापैकी जे कमी असेल त्या प्रमाणात दिले जाणार आहे.
त्याच प्रमाणे तुषार सिंचनासाठी २५ हजार रुपयांवरून ४७ हजार रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के यापैकी जे कमी असेल तेवढी रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. तसेच, ठिबक सिंचन संचासाठी अल्प, अत्यल्प व बहुभूधारकांना ९७ हजार किंवा ठिबक सिंचन संचाच्या प्रत्यक्ष खर्चाच्या ९० टक्के यापैकी जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे.
कोणाला मिळणार लाभ
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सर्वचं शेतकऱ्यांना मिळत नाही. राज्यातील फक्त अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळतो. अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी कॅटेगिरी मधील आदिवासी शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत विविध बाबींसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते.