Maharashtra Expressway : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांमध्ये विविध महामार्ग प्रकल्पाची कामे पूर्णत्वाला गेली आहेत. राज्यात महामार्गाचे जाळे विकसित करण्यात आले आहे. हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गांच्या जाळ्यामुळे राज्यातील कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत झाली आहे. राज्यात समृद्धी महामार्गासारखा हायटेक महामार्ग विकसित करण्यात आला आहे.
मुंबई आणि नागपूर या दोन प्रमुख शहरांना जोडणारा समृद्धी महामार्ग देखील आता अंतिम टप्प्यात आला आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला केला जाणार आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपुर आणि गोवा या दोन शहरांना जोडणारा शक्तीपीठ महामार्ग देखील तयार केला जाणार होता.
हा महामार्ग राज्यातील बारा जिल्ह्यांमधून प्रस्तावित होता. पण, आता हा महामार्ग रद्द करण्याचा मोठा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. जनमाणसांचा रेटा बघून शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला असल्याची घोषणा झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी या संदर्भात मोठी माहिती दिली.
मुश्रीफ म्हणालेत की शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला असल्याचे थेट अधिसूचनाचं मी घेऊन आलो आहे. कागल येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अधिसूचनेची प्रत शिवसेनेचे (ठाकरे) माजी आमदार संजय घाटगे यांच्याकडे सुपूर्द केली.
निवडणुकीला दोन महिने बाकी असताना घाटगे यांनी धाडसी निर्णय घेऊन मला पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी माझ्याकडे केली होती, असा उल्लेख करून मुश्रीफ म्हणाले, की त्यांचा आदेश व जनमाणसांचा रेटा बघून शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याचा निर्णय १५ ऑक्टोबर रोजी घेण्यात आला आहे.
याबाबतची अधिसूचना घेऊन आज मी आलो आहे, असे नमूद करून मुश्रीफ यांनी अधिसूचनेची प्रत संजय घाटगे यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष व मुश्रीफ यांचा जयघोष सुद्धा केला.
यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शक्तीपीठ महामार्ग संदर्भात सुरू असणारा विरोध आणि शेतकऱ्यांचे आंदोलन आता थांबणार असे दिसते. दरम्यान आता आपण हा 802 किलोमीटर लांबीचा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प नेमका कसा होता याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसा आहे शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाची घोषणा गेल्या वर्षी झाली. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. हा महामार्ग ८०२ किलोमीटर लांबीचा राहणार असून नागपूर आणि गोव्याला जोडणार होता.
हा महामार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणारा असल्याने याला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले होते. हा मार्ग राज्यातील बारा जिल्ह्यांमधून प्रस्तावित असून यासाठी 86000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. हा मार्ग समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर विकसित करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस पवार सरकारने घेतला होता.
मात्र या ८०२ किलोमीटर लांबीच्या महामार्गात राज्यातील शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी बाधित होणार होत्या. त्यामुळे याला विरोध केला जात आहे. हा महामार्ग वर्धा जिल्ह्यातून सुरू होऊन यवतमाळ, नांदेड, धाराशिवमार्गे सिंधुदुर्ग येथे संपणार आहे.
हा सहा-लेन प्रवेश-नियंत्रित द्रुतगती मार्ग महाराष्ट्र अन गोवा राज्याला जोडला जाणार होता. राज्यातील बारा आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार होता. सध्या नागपूर ते गोवा दरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना 18 तास लागतात मात्र हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर हा प्रवासाचा कालावधी आठ तासांवर येणार होता.
वर्धा, नांदेड, परभणी, , धाराशिव, यवतमाळ, हिंगोली बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधून हा महामार्ग गेला असता. पण आता हा महामार्ग रद्द झाला असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे.