Maharashtra Expressway : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या महाराष्ट्रात विविध महामार्गाची कामे पूर्ण झाली आहेत. येत्या काही दिवसात मुंबई ते नागपूर दरम्यान विकसित होत असलेल्या समृद्धी महामार्गाचे काम देखील पूर्ण होणार आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे. या मार्गाला हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे.
आतापर्यंत या महामार्गाचे 625 किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले असून यावर वाहतूक देखील सुरू झाली आहे. सुरुवातीला डिसेंबर 2022 मध्ये समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा 520 किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला होता.
या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. यानंतर 2023 मध्ये शिर्डी ते भरविर हा 80 किलोमीटर लांबीचा टप्पा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा टप्पा वाहतुकीसाठी सुरु झाला.
तसेचं, भरवीर ते इगतपुरी हा 25 किलोमीटर लांबीचा टप्पा या चालू वर्षात सुरू झाला आहे. म्हणजेच नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग सध्या वाहतुकीसाठी सुरू आहे.
उर्वरित 76 किलोमीटर लांबीचे काम देखील युद्ध पातळीवर केले जात असून ऑगस्ट 2024 पर्यंत संपूर्ण समृद्धी महामार्गाने प्रवास करता येणे शक्य होणार आहे. समृद्धी महामार्गाचा बाकी राहिलेला टप्पा अर्थातच इगतपुरी ते आमने हा 76 किलोमीटर लांबीचा टप्पा ऑगस्ट 2024 मध्ये सुरू होणार आहे.
अशातच, आता समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम देखील लवकरच सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गाचा एक भाग म्हणून नागपूर ते चंद्रपूर दरम्यान नवीन महामार्ग तयार केला जाणार आहे.
हा महामार्ग 195 किलोमीटर लांबीचा राहणार असून समृद्धी महामार्गावरील वर्धा जिल्ह्याच्या सेलडोह इंटरचेंजपासून दुर्ग हैदराबाद मार्गाला चंद्रपूर जिल्ह्यातील नवेगाव मोरे दरम्यान हा महामार्ग तयार केला जाणार आहे.
या महामार्गाच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून निविदा मागवण्यात आल्या होत्या. यानुसार इच्छुक कंपन्यांनी निविदा देखील दाखल केल्या आहेत. या प्रकल्पासाठी 22 कंपन्यांच्या निविदा दाखल झाल्या आहेत.
हा मार्ग पोंभुर्णा, बल्लारपूर, राजुरा, कोरपना, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा तालुक्यातून जाणार आहे. हा महामार्ग एकूण 73 गावांमधून जाणार असून यासाठी जमिनीचे भूसंपादन लवकरच सुरू होणार आहे. हा मार्ग 195 किलोमीटर लांबीचा राहणार आहे.
या महामार्गामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला जलद गतीने राजधानी मुंबई पोहोचता येणे शक्य होणार आहे. हा मार्ग विदर्भातील विकासात मोलाची भूमिका निभावणार अशी आशा व्यक्त होत आहे.