Maharashtra Cotton Rate : दरवर्षी विजयादशमीच्या मुहूर्तापासून बाजारात नवीन कापसाची आवक वाढत असते. यानुसार यंदाही विजयादशमीपासून महाराष्ट्रातील अनेक बाजारांमध्ये कापूस आवक वाढली आहे.
सध्या राज्यातील विविध भागांमध्ये कापसाची वेचणी युद्ध पातळीवर सुरू आहे. राज्यातील मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात कापसाची वेचणी सुरू असून शेतकरी बांधव पैशांची निकड भासत असल्याने कापसाची विक्री करताना दिसतायेत.
तथापि, अजूनही राज्यातील बाजारांमध्ये कापसाची आवक कमीच आहे. दिवाळीनंतर मात्र कापसाची आवक वाढणार असे मत बाजार अभ्यासकांनी वर्तवले आहे. दुसरीकडे बाजारांमध्ये कमी आवक असतानाही कापसाला अपेक्षित भाव मिळत नाहीये.
यामुळे राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी बांधव चिंतेत सापडले आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर देखील यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख बाजारांमध्ये कापसाला अपेक्षित दर मिळालेला नाही.
दिवाळीच्या मुहूर्तावर कापसाला राज्यातील बाजारांमध्ये किमान साडेसहा हजार रुपयांपासून कमाल सात हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा भाव मिळाला आहे. अर्थातच अजूनही कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, 29 ऑक्टोबरला कापसाला कमीत कमी 06 हजार पाचशे रुपयांपासून 7 हजार 100 रुपयांपर्यंत दर मिळालाय.
यात मध्यम स्टेपल कापसाला सर्वाधिक 07 हजार 100 रुपयांचा दर मिळाला आहे. तसेच, 30 ऑक्टोबरला कमीत कमी 06 हजार 500 रुपये आणि सरासरी 07 हजार रुपये असा दर मिळालाय. 31 ऑक्टोबर बाबत बोलायचं झालं तर या दिवशीही कापसाचे दर हे सात हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपासच होते.
शिवाय, 01 नोव्हेंबरला वडवणी बाजारात सर्वसाधारण कापसाला 06 हजार 700 रुपये दर मिळाला. 02 नोव्हेंबरला अर्थातच बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी या बाजारात 6700 दर मिळाला.
तसेच, आज भाऊबीजेच्या मुहूर्तावर म्हणजे 3 नोव्हेंबरला राज्यातील समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाला 07 हजार रुपयांचा दर मिळालाय. अर्थातच दीपोत्सवाच्या काळातही महाराष्ट्रातील बाजारांमध्ये कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला आहे.
दरम्यान आता आगामी काळात कापसाचे दर कसे राहणार ? हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. खरेतर, केंद्रातील मोदी सरकारने या नव्या हंगामात मध्यम स्टेपल कापसाला 07 हजार 121 रुपये असा हमीभाव जाहीर केला आहे आणि लांब स्टेपल कापसाला 07 हजार 521 रुपये असा एमएसपी ठरवण्यात आला आहे.
खरे तर गेल्या दोन वर्षांपासून कापूस पिकाला बाजारात अपेक्षित दर मिळत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना या पिकातून अपेक्षित कमाई होत नाहीये. अनेक शेतकऱ्यांना या पिकासाठी आलेला खर्च देखील वसूल करता येत नाहीये.
म्हणून कापसाला किमान हमीभाव तरी मिळावा यासाठी सरकारने हस्तक्षेप करणे आवश्यक असल्याचे मत काही जाणकारांकडून व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी देखील या वर्षा सारखीच परिस्थिती पाहायला मिळाली होती, बाजारात कापसाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाला होता.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आणि परिणामी राज्य सरकारला कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अनुदानाची घोषणा करावी लागली होती. यामुळे आता यंदाच्या कापसालाही सरकारला अनुदान द्यावे लागणार की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.