Maharashtra Bullet Train : गेल्या काही वर्षांमध्ये शासन आणि प्रशासनाने रेल्वे तथा रस्ते वाहतूक सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. प्रामुख्याने रेल्वे वाहतूक सुधारण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून 160 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणारी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली आहे. ही ट्रेन पहिल्यांदा 2019 मध्ये सुरू झाली.
सुरवातीला ही गाडी नवी दिल्ली ते वाराणसी या मार्गावर चालवली गेली आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने देशातील इतरही मार्गांवर ही ट्रेन सुरु झाली. आजच्या घडीला ही ट्रेन देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवर धावत आहे.
विशेष म्हणजे येत्या भविष्यात देशातील आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर या गाडीला सुरू केले जाणार आहे. दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस नंतर आता बुलेट ट्रेन देखील लवकरच रुळावर येणार अशी शक्यता आहे.
मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. दरम्यान या प्रकल्पाबाबत नुकतीच एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार आपल्या राज्यातील पालघर आणि ठाणे या 2 जिल्ह्यात बुलेट ट्रेनचे काम सुरू झाले आहे.
नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (NHSRCL) ने सांगितले की, हे काम महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील शिळफाटा ते जारोली गावापर्यंत विस्तारणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पॅकेज-सी 3 चा भाग म्हणून केले जात आहे.
या प्रकल्पाअंतर्गत 135 किमी लांबीच्या भू-तांत्रिक तपासणीचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. या भागातील डोंगरात दोन बोगद्यांचे कामही सुरू आहे. अनेक ठिकाणी घाटांच्या पायाभरणीचे कामही सुद्धा सुरू झाले आहे. सध्या गर्डरच्या पूर्ण स्पॅन आणि सेगमेंट कास्टिंगसाठी कास्टिंग यार्ड विकसित केले जात आहेत.
बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पॅकेज सी अंतर्गत सुरू असणारे हे काम जलद गतीने केले जात असून लवकरात लवकर याचे काम पूर्ण करण्याचा मानस प्रशासनाचा आहे. या पॅकेज अंतर्गत तीन रेल्वे स्थानक विकसित होणार आहेत.
ठाणे, विरार आणि बोईसर अशी ही तीन स्थानके राहतील. राजधानी मुंबई मधील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि शिळफाटा या भूमिगत स्थानकांदरम्यान 21 किमी लांबीच्या भारतातील पहिल्या समुद्राखालील बोगद्याचे बांधकाम सुद्धा सुरू झाले आहे. हा 21 किलोमीटर लांबीचा भारतातील पहिला सर्वाधिक लांबीचा समुद्रखालील बोगदा प्रकल्पाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे.
यामुळे याचे देखील काम आता सुरू झाले असल्याने प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण होईल अशी आशा व्यक्त होत आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा हा 2026 मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल असा अंदाज आहे. या प्रकल्पाच्या खर्चाबाबत बोलायचं झालं तर या प्रकल्पासाठी 1.08 लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
या प्रकल्पामुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास फक्त आणि फक्त दोन तासात पूर्ण होणार आहे. सध्या रेल्वे मार्गाने या प्रवासासाठी सहा तासांचा कालावधी खर्च करावा लागतोय आणि रस्ते मार्गाने यासाठी नऊ तास लागतात. अर्थातच या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे मुंबई ते अहमदाबाद हा प्रवास वेगवान होणार आहे. या मार्गावर 320 किलोमीटर प्रतितास या वेगाने बुलेट ट्रेन धावणार आहे.