Maharashtra Black Wheat Farming : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये पीक पद्धतीत महत्त्वाचा बदल पाहायला मिळाला आहे. शेतकरी बांधव आता विविध पिकांची लागवड करू लागले आहेत. वेगवेगळ्या पिकांच्या शेतीमधून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहेत. विशेष म्हणजे पारंपरिक पिकांच्या शेतीत देखील बदल झाला आहे.
शेतीत केलेल्या या बदलांमुळे काही सकारात्मक परिणाम देखील पाहायला मिळाले आहेत. शेतकरी बांधव वेगवेगळे प्रयोग राबवत आहेत. दरम्यान, असाच एक प्रयोग महाराष्ट्राच्या मातीतून समोर आला आहे.
एका मराठमोळ्या शेतकऱ्याने चक्क काळ्या गव्हाची लागवड करून दाखवली आहे. विशेष म्हणजे, हा पट्ठ्या काळ्या गव्हाची तब्बल दहा हजार रुपये प्रति क्विंटलने विक्री सुद्धा करत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील काकदे गावातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने ही किमया साधली आहे.
बाबूलाल माळी नामक या सातपुडा पर्वतरांगांमध्ये वसलेल्या छोट्याशा गावातील शेतकऱ्याने हा भन्नाट प्रयोग केला आहे. खरे तर, काळ्या गव्हाची गेल्या दोन वर्षांपासून उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात शेती केली जात आहे.
दरम्यान उत्तर भारतातील शेतकऱ्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पंजाबमधील मोहाली येथील राष्ट्रीय कृषी आणि जैवतंत्रज्ञान संस्थेने विकसित केलेल्या काळ्या गव्हाची बाबूलाल माळी यांनी देखील लागवड केली आहे. माळी हे पुण्यात नोकरीला होते.
विशेष म्हणजे उच्च शिक्षण घेतलेले असतानाही त्यांना शेतीची आवड होती. यामुळे त्यांनी सेवानिवृत्तीनंतर शेतीच करायची असे मनोमनी ठरवलेले होते. या अनुषंगाने त्यांनी आठ एकर शेत जमीन खरेदी केली होती.
दरम्यान सेवानिवृत्तीनंतर पुण्यातून आपल्या गावी परतत त्यांनी शेतीमध्ये आपले कसंब दाखवले आहे. शेतीमध्ये ते सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. असाच एक प्रयोग म्हणजे काळ्या गव्हाची लागवड. विशेष म्हणजे हा प्रयोग त्यांचा पूर्णपणे यशस्वी ठरला असून त्यांना यातून चांगले उत्पादन मिळाले आहे.
कुठून खरेदी केले बियाणे
माळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथील एका शेतकऱ्याकडून काळ्या गव्हाचे बियाणे खरेदी केले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात याची 20 गुंठे जमिनीत पेरणी केली. यासाठी त्यांनी 20 किलो एवढे बियाणे वापरले. सध्या त्यांनी पेरणी केलेला गहू हा चार फुटापर्यंत वाढला आहे.
येत्या काही दिवसात या गव्हाची हार्वेस्टिंग पूर्ण होईल आणि यातून त्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे. सामान्य गहू हा बाजारात 4,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला जात असतो. मात्र हा काळा गहू बाजारात तब्बल आठ ते दहा हजार रुपये प्रति क्विंटल दरात विकला जाईल अशी माहिती माळी यांनी यावेळी दिली आहे.
यामुळे त्यांना वीस गुंठे जमिनीतूनच चांगली कमाई होण्याची आशा आहे. काळ्या गव्हाचे सेवन मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने बाजारात याला मोठी मागणी राहते आणि बाजारभाव देखील चांगला मिळतो असे त्यांनी सांगितलं आहे.