Maharashtra Agriculture Scheme : महाराष्ट्र हे शेतीप्रधान राज्य आहे. राज्याची निम्म्याहून अधिकच जनसंख्या ही प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेती व शेती पूरक व्यवसायावर आधारित आहे. अलीकडे मात्र शेतीचा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी खूपच आव्हानात्मक बनला आहे. पारंपारिक शेती व्यवसाय शेतकऱ्यांना परवडत नसून शेतीमधून अपेक्षित अशी कमाई होत नसल्याने राज्यातील बहुतांशी शेतकरी कर्जबाजारी होत आहेत.
परिस्थिती एवढी विदारक आहे की राज्यात शेतकरी आत्महत्येचा ग्राफ दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.
अशातच आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने महाबळेश्वरच्या धर्तीवर भीमाशंकर येथे स्ट्रॉबेरीसाठी क्लस्टर निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
भीमाशंकर येथील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या ठिकाणी स्ट्रॉबेरी उत्पादनाला चालना दिली जाणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा विकास सूनिश्चित होणार आहे. सोबतच या परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटन वृद्धी होणार आहे.
यामूळे या भागाचा एकात्मिक विकास सुनिश्चित होण्यास मदत मिळणार आहे. आदिवासी विकास विभाग व कृषी विभागाने भीमाशंकर येथे स्ट्रॉबेरी लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
विशेष म्हणजे या भागातील वातावरण स्ट्रॉबेरी लागवडीसाठी अनुकूल असल्याने शेतकऱ्यांनी आता कृषी विभागाच्या या प्रयत्नाला भरभरून असा प्रतिसाद दाखवला आहे. त्यामुळे या भागात स्ट्रॉबेरी लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. स्ट्रॉबेरीची शेती या भागातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर देखील ठरू लागली आहे.
या अंतर्गत शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रशिक्षण दिले जात आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन पुरवले जात आहे. स्ट्रॉबेरी लागवडीच्या पूर्वतयारीसाठी वेगवेगळ्या भागात परीक्षणाचे काम सुरू आहे.
निश्चितच कृषी विभागाने आणि आदिवासी विकास विभागाने स्ट्रॉबेरी लागवडीला प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याने या भागातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून त्यांच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
खरतर आंबेगाव तालुक्यातील आदिवासी गावांमध्ये स्ट्रॉबेरी उत्पादनाला चालना देण्यासाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी मंत्रालयात एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. यावेळी आदिवासी विकास विभागाकडून शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल अशी ग्वाही देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी या भागातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीसाठी 50,000 पर्यंतचे अनुदान देखील पुरवले जाणार असल्याची ग्वाही यावेळी दिली आहे.