Maharashtra Agriculture Scheme : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाची अर्थव्यवस्था देखील शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. यामुळे शेतीसाठी आणि शेतकऱ्यांसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत. महाराष्ट्र राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन आणि उत्पन्न वाढावे यासाठी शेकडो योजना चालवत आहे. या योजनांच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्याचे काम सरकारकडून सुरु आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका विकास योजना ही देखील अशीच एक कौतुकास्पद योजना आहे. महत्त्वाचे म्हणजे या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना तब्बल दोन लाख 77 हजार पाचशे रुपयांचे अनुदान महाराष्ट्र सरकारकडून उपलब्ध करून दिले जात आहे.
म्हणून आज आपण या महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका विकास योजनेचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. या योजनेचे स्वरूप नेमके कसे आहे, किती अनुदान मिळते, याचा लाभ कुणाला मिळतो, अर्ज कुठे करावा लागतो अशा वेगवेगळ्या बाबींची आज आपण माहिती पाहणार आहोत.
योजनेचे स्वरूप कसे आहे?
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे, भाजीपाला पिकांची दर्जेदार आणि कीडमुक्त रोपे उपलब्ध करण्याला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर रोपवाटिका विकास योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना शेडनेट, पॉलीटनेल, पावर नॅपसॅक स्प्रेयर आणि प्लास्टिक क्रेटस साठी अनुदान दिले जात आहे.
कमाल किती अनुदान मिळते?
या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना 1,000 चौरस मीटरच्या शेडनेटची साहित्यासह उभारणीचा खर्च 5 लाख 55 हजार गृहित धरुन कमाल 2 लाख 77 हजार 500 रुपये अनुदान दिले जाते.
कुणाला लाभ मिळतोय?
या योजनेचा लाभ किमान 40 गुंठा म्हणजेच एक एकर जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना मिळतो.
यासोबतच याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे शाश्वत पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक असते.
या योजनेसाठी महिला कृषी पदवीधारक, महिला गट, महिला शेतकरी द्वितीय, भाजीपाला उत्पादक, अल्प भूधारक, शेतकरी गट यांना प्राधान्य दिले जाते.
अनुदान किती टप्प्यात मिळते
या योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान एकूण दोन टप्प्यात पात्र लाभार्थ्यांना दिले जाते. अनुदान मंजूर करण्यापूर्वी कृषी सहायक जिथं रोपवाटिका उभारली जाणार आहे त्याची प्रत्यक्ष भेटी देऊन स्थळ पाहणी करतात. जर पात्र लाभार्थ्यांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतर सर्व गोष्टी योग्य असतील तर पात्र लाभार्थ्याला अनुदान मिळते.
पहिल्या टप्प्यात अनुदानाची 60 टक्के रक्कम पात्र शेतकऱ्यांना दिली जाते. उर्वरित 40 टक्के रक्कम दुसऱ्या टप्प्यात मिळते. रोपवाटीकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री आणि इतर गोष्टी झाल्यानंतर दुसऱ्यांदा कृषी सहाय्यक स्वतः जाऊन संबंधित प्रकल्पाची पाहणी करतात. पाहणी पूर्ण झाल्यानंतर मग दुसऱ्या टप्प्यातील 40% रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते.
अर्ज कुठं करणार?
महाडीबीटीच्या अधिकृत संकेतस्थळावर म्हणजे https://mahadbt.maharashtra.gov.in यां अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक आणि पात्र शेतकऱ्यांना यासाठी अर्ज सादर करता येतो. या योजनेबाबतची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तालुका कृषी अधिकाऱ्याकडे संपर्क साधू शकता.